BULDANA LIVE SPECIAL! जिल्ह्याच्या राजकारणावर बोलू काही!  बुलडाण्यात ठिकठिकाणी "बीआरएस"चे पोस्टर!

अबकी बार किसान सरकार चा नारा; तिकडे कुठे जमले नाही तर "या" शेतकरी नेत्याला लोकसभेसाठी हा पर्याय आहेच की! बीआरएसलाही तेच हवेय..! काय झाल्यास काय होऊ शकते? वाचा...

 

बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुका आता अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने या निवडणुकीची तयारी करण्यात गुंतला आहे. आजघडीला तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा अशी लढत होईल असे चित्र आहे. अर्थात असे होईलच हे कोणताही राजकीय विश्लेषक ठामपणे सांगू शकत नाही..कारण राजकारणात कधी काय होईल याचा नेमच राहिला नसल्याचे महाराष्ट्राची जनता अनुभवत आहे..तर मुद्दा आहे तो महाराष्ट्रात "बीआरएस" म्हणजेच तेलंगणा चे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या एंट्रीचा. महाराष्ट्रात चंद्रशेखर राव यांनी चांगल्याच सभा घेतल्या आहेत. महाराष्ट्रातील आगामी लोकसभा,विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर ठेवून चंद्रशेखर राव पक्षबांधणी करीत आहेत. आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या पक्षातील स्थानिक पातळीवरील ताकदीचे नेते आता बीआरएस मध्ये प्रवेश करीत असल्याचे दिसत असल्याने त्यांना पक्षबांधणीत बऱ्यापैकी यशदेखील मिळत आहे. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर चंद्रशेखर राव त्यांचे अख्खे मंत्रिमंडळ घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत येणार आहेत, त्यानंतर ते तुळजापूरला देखील तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत..यावरून चंद्रशेखर राव यांच्या डोक्यात महाराष्ट्राच्या बाबतीत नेमके काय चालू असेल यांचा अंदाज कुणीही बांधू शकतो. शेतकरी चळवळीचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या बुलडाण्यात देखील आता बीआरएस चे पोस्टर झळकू लागले आहेत. अबकी बार किसान सरकार असा नारा त्या पोस्टर वर देण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत बुलडाणा लोकसभा क्षेत्रात उमेदवार देण्यासाठीही बीआरएस प्रयत्नशील असणार असल्याचे समजते, त्यासाठी एका "शेतकरी नेत्यावर" बीआरएस ची नजर असू शकते.

तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांनी केलेल्या विकासकामांच्या आधारावर ते आता राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करू पाहत आहेत. त्यासाठी तेलंगणा हे विकासाचे मॉडेल म्हणून तसा प्रचार सुरू आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी के.चंद्रशेखर राव यांनी राबविलेल्या योजनांची आणि त्याला मिळालेल्या यशाची देशभर चर्चा आहे. के.चंद्रशेखर राव यांनी राबविलेल्या योजनांमुळे तेलंगणातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरमसाठ वाढ झाली आहे. हाच मुद्दा ध्यानात घेत शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून बीआरएस आता महाराष्ट्रात आपली पाळेमुळे रोवण्यासाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील नेत्यांशी जवळीक करून बीआरएस चे हे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील नेत्यांनी अनेकदा के. चंद्रशेखर राव यांच्या शेतकरी हिताच्या योजनांचे कौतुकदेखील केले आहे. तर मुद्दा आहे तो बुलडाणा लोकसभेचा...!

शेतकरी नेत्यासमोर अडचणींचा डोंगर...

शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी कायम व्यवस्थेची भांडत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील मोठा शेतकरी वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. गत दोन वेळेस विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढण्याची संधी हुकल्यानंतर यावेळी मात्र ते थांबवण्याच्या मानसिकतेत दिसत नाही.काही झाले तरी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढायचीच असा प्रण त्यांनी घेतलेला आहे. मात्र असे असले तरी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतांना त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
सर्वात पहिली अडचण आहे ती त्यांच्या पक्षाची..! स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर निवडणुक लढण्याची शक्यता कमी आहे. सद्यस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीच्या बाजूने राहील असे चित्र आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून आधीच भरपूर दावेदार आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ.राजेंद्र शिंगणे, काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ या सगळ्या नावांना डावलून रविकांत तुपकरांना उमेदवारी मिळवताना जड जाईल अशी चिन्हे आहेत. एकवेळ मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला तर डॉ.राजेंद्र शिंगणे रविकांत तुपकरांचे नाव पुढे करतीलही पण उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या  मतदारसंघावर प्रबळ दावा सांगत आहे, कारण गत ३ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा जिंकता आलेली नाही.
   
   बीआरएस पर्याय..?

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना रविकांत तुपकरांकडे भाजपचा देखील पर्याय होता. मात्र  राज्यातील सत्तांतरानंतर आता तो पर्याय मावळला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तिकडे कुठे जमले नाही तर शेतकरी मुद्द्यावर बीआरएस  हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी युती झाली किंवा तसे झालेही नाही तरी शेतकरी मुद्द्यावर थेट बीआरएस मध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवणे  या पर्यायाची पडताळणी रविकांत तुपकर करू शकतात. लोकसभा निवडणुक लढवण्यासाठीचे आर्थिक पाठबळ या पर्यायामुळे त्यांना उपलब्ध होऊ शकते. दुसरीकडे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी बीआरएस ला देखील चांगल्या नेत्यांची आवश्यकता आहे.रविकांत तुपकर यांच्यासारखा आक्रमक आणि शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेला चेहरा बिआरएसला आपल्या तंबूत का नको असेल? त्यामुळे बीआरएस कडून देखील तूपकरांना आपल्या बाजूने घेण्यासाठी प्रयत्न चालू झाले असतील...!