Buldana Live निष्कर्ष! खंडेलवाल राजकीय भूकंप घडविण्याच्या बेतात!

प्रथमच कमळ उमलण्याची चिन्हे!!
 
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विधान परिषदेच्या अकोला- बुलडाणा- वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या लढतीचा धुराळा खाली बसलाय! सर्वसामान्य नागरिकांच्या आकलनापलिकडे असलेल्या या निवडणुकीचा तोंडावर आलेला निकाल देखील जाणकारांना दिसू लागलाय! निवडणूक जाहीर झाल्यावर गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे झुकलेला अनुकूल निकालाचा लंबक, मतदानानंतर मात्र वसंत खंडेलवाल यांच्याकडे झुकलेला दिसतोय. यंदा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागणार असून, बाजोरियांची सद्दी संपवत खंडेलवालांचा कमळ उमलविण्याचा प्रयत्‍न यशस्वी झाल्याचा निष्कर्ष बुलडाणा लाइव्हने अभ्यासांती काढला आहे. त्‍यामुळे महाविकास आघाडीतील नेत्‍यांचे (काहीच बरं) धाबे दणाणले आहेत.

एकीकडे २०० मतांच्या फरकाने विजयी होण्याचे दावे करतानाच स्थानिक ते उच्च न्यायालय अन्‌ अल्पावधी असतानाही सुप्रीम कोर्टातपर्यंत प्रतिस्पर्धीविरुद्ध धाव घेणे म्हणजे, आघाडीच्या उमेदवाराने कमळाची चांगलीच धास्ती घेतली होती. किंबहुना यातून त्यांची भीती व्यक्त झाली असे राजकीय विश्लेषक मानत आहेत. ही एकच बाब आघाडी उमेदवाराच्या आत्मविश्वासाला खंडेलवाल यांनी तडा दिल्याचे, त्यांनी तगडी लढत दिल्याचे सिद्ध करणारी आहे.

१५ वर्षांपासून एकच नाव, एकच उमेदवार, निवडणुकीनंतर फारसा संपर्क नसणे, विकास व निधीच्या बाबतीत फारसे स्वारस्य नसणे यामुळे बाजोरियाबद्दल अँटी इंकम्बसी हा विरोधात जाणारा मोठा मुद्दा होता. सदस्य तर सोडाच पण तीन जिल्ह्यातील आघाडीच्या खासदार, आमदारांसोबतही त्यांचे फारसे सख्य नाही, अशी नाराजी दिसून आली. आघाडीमधील ३ पक्षांना आपले स्थानिक राजकारण सांभाळायची पडलेली, मागच्या लढतीत ज्याच्या विरोधात पडलो त्याच्या हाताखाली काम करायचे ते कसे हा त्यांचा यक्ष अन्‌ प्रॅक्टिकल प्रश्न..! यामुळे अपवाद वगळता आघाडीमधील बिघाडी मतदानापर्यंत कायम राहिली अशी चर्चा आहे. यामुळे शरीराने सोबत पण मनाने दूर अशी आघाडीची गत होती. आपले राजकारण पहिले या विचाराने बहुतेक नेत्यांनी सोयीस्कर राजकारण केले.

आपल्या स्थानिक प्रतिस्पर्ध्याची जिरवायची, त्याला मोठे होऊ द्यायचे नाही अन्‌ त्याला क्रेडिट मिळू द्यायचे नाही असा त्यांचा हिशोब. यामुळे भल्याभल्या नेत्यांनी अवैध तडजोड करून क्रॉस वोटिंगचे नवनवीन प्रयोग केले. यावर टपून बदलेल्या टीम खंडेलवाल यांनी अशा बिघाडीचा भरपूर आणि पुरेपूर फायदा करून घेतला. पाठीशी २४४ मतांचे एकगठ्ठा मतदान, जोडीला बिघाडीमुळे मिळविलेली बोनस मतांची आघाडी, "अकोला पॅटर्न'चा मदतीचा हात अशी जबरदस्त जुगाड टेक्नॉलॉजी वापरीत भाजपने शांतीमें क्रांती केल्याचे आता उघड होत आहे. विक्रमवीर उमेदवाराला नजीकच्या काळात लाल दिवा मिळणार ही (पेरलेली) अफवा आघाडीच्या नेत्यांना अस्वस्थ करणारी अन्‌ आघाडीचे नुकसान करणारी ठरल्याची चर्चा आहे. यामुळे चौकाराचे बाजोरियांचे मनसुबे उध्वस्त करत मतदारसंघात प्रथमच कमळ फुलण्याची दाट शक्यता आहे.