नानांच्या वक्‍तव्‍यावर बुलडाणा काँग्रेसचे पांघरूण; समर्थनार्थ निदर्शने

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पंतप्रधान देशाचे असतात... त्‍यांचा अपमान हा देशाचा अपमान असतो. तरीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्‍यांना मारण्याची भाषा करणे अत्‍यंत निषेधार्ह असल्याच्या प्रतिक्रिया जिल्हाभरातून उमटत आहे. मात्र काँग्रेसने नानांच्या वक्‍तव्‍यावर पांघरुण घातले असून, भाजपच मोदींची बदनामी करत असल्याचा आरोप करत नाना पटोलेंच्या समर्थनार्थ बुलडाण्यातील गांधी भवनात निदर्शने केली. काल, १८ जानेवारीला पटोलेंच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या. त्‍यामुळे राजकीय वर्तुळात सारेच चक्रावले आहेत.

प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड यांनी निदर्शनांचे नेतृत्त्व केले. त्‍यानंतर पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्‍हटले आहे, की नाना पटोले मोदी नावाच्या स्‍थानिक गुंडाबद्दल बोलत होते. नाना म्‍हणाले, की गुंड मोदीला आपण शिव्या देऊ शकतो, मारू शकतो... मात्र या घटनेचा व्हिडिओ व्हायरल करत त्‍याचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जोडणे अत्‍यंत दुर्दैवी असल्याचे निवेदनात म्‍हटले आहे.

राज्‍यातील भाजपाचे नेते जाणीवपूर्वक गावगुंड मोदीबाबत केलेल्या वक्‍तव्‍याशी पंतप्रधानांचा संबंध जोडून पंतप्रधान पदाचा अपमान करत आहेत. लोकांची दिशाभूल करणे दखलपात्र गुन्हा असून, भाजपा नेत्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे. यावेळी दीपक रिंढे, शैलेश खेडेकर, तुळशीराम नाईक, राजेश पोलाखरे, चित्रांगण खंडारे, विनोद बेंडवाल, महेश ढगे, गौरव नाईक, संतोष पाटील, प्रभाकर इंगळे, गोपालसिंग राजपूत, मोईन काझी आदी पदाधिकारी उपस्थित होते.