BREAKING रविकांत तुपकर आत की बाहेर? १५ फेब्रुवारीला होणार फैसला; तुपकरांच्या जामीन अर्ज रद्द करण्याच्या पोलिसांच्या मागणीवर न्यायालयाने निकाल राखून ठेवला! 

तुपकर म्हणाले, काही पुढाऱ्यांना आम्ही जड झालो, पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमचा घात करण्याचा डाव...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा जामीन अर्ज रद्द करण्याची मागणी बुलडाणा शहर पोलिसांनी जिल्हा न्यायालयाकडे केली होती. काल, ७ फेब्रुवारीला यावर सुनावणी होणार होती, मात्र कनिष्ठ न्यायालयाचे अभिलेख प्राप्त न झाल्याने आज ८ फेब्रुवारीला सुनावणी ठेवण्यात आली होती.  ठरल्याप्रमाणे आज सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू झाली. तब्बल २ तास सुनावणी झाली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल देण्यासाठी १५ फेब्रुवारीची तारीख दिली आहे. त्यामुळे रविकांत तुपकर कारागृहात जाणार की बाहेर राहणार याचा फैसला आता १५ फेब्रुवारीला होणार आहे..

रविकांत तुपकर सराईत गुन्हेगार आहेत, ते विध्वसंक प्रवृत्तीचे आहेत. तुपकर यांचे आंदोलन सामान्य जनतेला प्रभावित करतात, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे तुपकर यांचा जामीन रद्द करून त्यांना तुरुंगात पाठवावे अशी मागणी बुलडाणा शहर पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती.  आज, सरकारी पक्षाच्या वतीने ॲड एस.एम खत्री तर रविकांत तुपकर यांच्या वतीने त्यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांनी युक्तिवाद केला. रविकांत तुपकर यांच्यावर दाखल झालेले गुन्हे आंदोलनात्मक स्वरूपाचे आहेत. त्यांच्यावरील गुन्हे काही चोरी, दरोडा, भ्रष्टाचार यासारखे अनैतिक स्वरूपाचे नाहीत. भारताला स्वातंत्र्य देखील आंदोलनातून मिळाले, शेतकऱ्यांसाठी लढणे काही गुन्हा होऊ शकत नाही अशी बाजू यावेळी ॲड. शर्वरी तुपकर यांनी मांडली. आता यावर निर्णय घेण्यासाठी १५ फेब्रुवारीची तारीख न्यायालयाने दिली आहे..


  पुढाऱ्यांना आम्ही जड झालो: रविकांत तुपकरांचा हल्लाबोल..

दरम्यान न्यायालयातून बाहेर आल्यानंतर तुपकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. शेतकऱ्यांसाठी एकदा काय हजार वेळा तुरुंगात जायचे काम पडले तरी मागे हटणार नाही. आमच्या आंदोलनाला ,शेतकऱ्यांच्या लढ्याला मिळत असलेले प्रतिसाद पाहून काही पुढाऱ्यांना आम्ही जड झालो आहोत. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमचा घात करण्याचा त्यांचा डाव आहे. मात्र न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही असे तुपकर म्हणाले..