BREAKING पालकमंत्री दिलीप वळसे पाटील उद्यापासून दोन दिवस जिल्हा मुख्यालयात! "या" कामांचा घेणार आढावा, अधिकारी लागले कामाला...
Nov 22, 2023, 08:13 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील गुरूवार दि.२३ नोव्हेंबर पासून दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. बुलडाणा जिल्ह्याच्या पालक मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर दुसऱ्यांदा त्यांचा दौरा होत आहे.
गुरुवारी सकाळी ९ वाजता ते बुलडाणा येथील शासकीय विश्राम गृह येथे दाखल होतील. त्यांनतर त्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुष्काळ व्यवस्थापन, जल जीवन मिशन, मजीप्रा अंतर्गत कामाची व टंचाईबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक होणार आहे . तसेच कृषी, तांडावस्ती आराखडा, रमाई घरकुल (शहरी व ग्रामीण) योजना संदर्भातील बैठकीत आढावा घेतील. त्याशिवाय सिंदखेडराजा, लोणार आणि शेगाव विकास आराखड्याबाबत जिल्हास्तरीय बैठक, जिल्हा क्रीडा संकुल समितीचा आढावाही ते घेणार आहेत. जिल्हा दक्षता समिती व हुतात्मा स्मारकाबाबत पालकमंत्री आढावा घेणार आहेत. त्यानंतर रात्री शासकीय विश्रामगृहात मुक्काम राहील. दुस-या दिवशी शुक्रवार, (दि.२४) रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर ते दुपारी अडीच वाजता शासकीय विश्राम गृहाकडे जातील.त्यानंतर सोईनुसार समृद्धी महामार्गाने पुण्याचा दिशेने मार्गस्थ होतील. दोन दिवसांच्या दौऱ्यात पालकमंत्री जिल्ह्यातील अनेक रखडलेल्या कामांचा आढावा घेणार आहेत, त्यामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकारी कामाला लागले आहेत.