ब्रेकिंग खुशखबर! जात पडताळणी पोचपावती सादर करण्यास मुदतवाढ!!
बुलडाणा जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतीच्या 166 रिक्त पदांसह राज्यातील 4554 ग्राम पंचायत च्या 7130 रिक्त पदांसाठी 21 डिसेंबरला मतदान होत आहे. यासाठी 30 नोव्हेंबर ते आज 6 डिसेंबर दरम्यान नामांकन प्रक्रिया पार पडली. याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 अशी होती. मात्र ग्रामीण उमेदवारांची अडचण व मागणी लक्षात घेता आज अर्ज भरण्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली.
तसेच कास्ट व्हॅलीडीटी संदर्भात देखील सवलत व मुदतवाढ देण्यात आली. निवडणूक कार्यक्रमात अर्जा सोबतच जातपडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याची पोचपावती व निर्धारित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र आयोगाने आता त्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ओबीसी, एससी, एसटी अश्या राखीव प्रवर्गातून लढणाऱ्या हजारो उमेदवारांना उद्या 7 डिसेंम्बर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत ही पोच पावती देण्याची मुभा देण्यात आली आहे.
अन्य तरतूद...
दरम्यान राखीव उमेदवारांमध्ये व्हॅलीडीटी सादर करण्यासंदर्भात संभ्रम असल्याचे चित्र आहे. याविषयी निवडणूक विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी यासाठी असलेली तरतूद स्पष्ट केली. यानुसार निवडून आल्यापासून 12 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करता येते. पूर्वी 30 दिवसांचीच मुदत होती. मात्र या मुदतीत वैधता सादर करता न आल्याने शेकडो सदस्य वा सरपंच अपात्र ठरत होते. यामुळे शासनाने एका वर्षाची मुदत दिली आहे.