BL Exclusive : संभाव्य जि. प. गटांची उत्सुकता शिगेला... मतदारसंघ रचनेचे उत्तर दडलंय "उत्तर' मध्येच! झेड पद्धतीने होणार संरचना; प्राथमिक आराखड्यावर लवकरच शिक्कामोर्तब?
बातमीच्या शिर्षकाने संभ्रम वाढला असेल तर त्यात काही नवल नाय! मात्र पुढे सरकल्यावर तो दूर होणार हाय. या सर्व प्रश्नाचे तांत्रिक उत्तर खरोखरच दडलंय ते "उत्तर' या शब्दात. याचे कारण बुलडाणा जिल्हा परिषदेच्या सर्व गटांची आणि १३ पंचायत समित्यांच्या गणांची रचनेची सुरुवात उत्तर या दिशेने होणार आहे. उत्तरेकडून पूर्व, मग पश्चिम आणि नंतर दक्षिणेकडे सरकत गट आणि गणाची रचना करण्यात येत आहे. या रचनेचा आकार इंग्रजी अक्षरातील झेड या आकाराचा होतो. म्हणजे मतदारसंघाची रचना झेड पद्धतीने होत असल्याचे वृत्त आहे. या रचनेचे उत्तर "उत्तर' या शब्दामध्ये का दडलंय याचा उलगडा आता झाला असणार हे नक्की.
पालिकेचे वाढणार, जि.प.चे काय?
दरम्यान, राज्य शासनाने वाढीव लोकसंख्या लक्षात घेता नगरपालिका, महापालिकेची प्रभागसंख्या वाढविण्याचा निर्णय सरत्या वर्षा अखेरीस घेतला होता. त्यासाठी अ, ब, क वर्ग पालिकासाठीचे निर्देशसुद्धा मिळाले. त्यानुसार पालिकांनी वाढीवसह प्रभाग रचनेचे कच्चे आराखडे शासनाकडे सादर केले. पालिकाची मुदत जिल्हा परिषदेपूर्वी संपणार असल्याने ही कार्यवाही करण्यात आली. त्याच धर्तीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे मतदारसंघ देखील वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. मात्र आजपावेतो यासंदर्भातील लेखी निर्देश निर्गमित करण्यात आले नाहीये! यामुळे प्रशासकीय वर्तुळासह राजकीय क्षेत्रातील संभ्रम कायम आहे. नेमके काय होणार? याबद्धलची उत्सुकता आता धुक्याने माखलेल्या आकाशाला भिडली हाय!
६१ की ६८?
लोकसंख्या वाढीचे निकष लक्षात घेतले तर बुलडाणा जि.प.चे गट ६८ आणि पं. स.चे गण १३६ होतील. मात्र ते वाढणार की कायम राहणार, ६१ की ६८ गट हे प्रश्न ग्रामीण रहिवासी, राजकारण्यांनाच नव्हे तर यंत्रणांनाही देखील छळत आहे. यामुळे तहसील कार्यालयांनी ६१ व ६८ अशा दोन्ही संख्येनुसार कच्चे आराखडे तयार केल्याचे वृत्त आहे. जे निर्देश आले त्यानुसार रचना प्रस्ताव सादर करायचे असे रोखठोक धोरण यामागे आहे. मात्र ६८ चे निर्देश आले तर ग्रामीण भागात अक्षरशः राजकीय भूकंप ठरलेलाच! मग सध्याच्या मतदारसंघाची रचना एकदमच बदलणार आहे. विद्यमान व माजी सदस्य, प्रस्थापित नेते, जिल्हाध्यक्ष या मंडळींना याची जास्तच म्हणजे वाढीव धास्ती आहे...