बुलडाणा आणि सिंदखेडराजाच्या जागेसाठी भाजपा आग्रही ! भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. मांटे म्हणतात, दोन्ही पक्ष विभागलेले...आम्ही मात्र एकसंघ! महायुती मध्ये रंगणार नाराजीनाट्य ?
Oct 18, 2024, 16:12 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यात २०१४ पर्यंत तीन आमदार संख्येवर असलेली भाजप २०१९ मध्ये मलकापूरची जागा गमावली आणि चिखलीची जिंकल्याने तीन वरच थांबली. त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडी राजकारणाच्या नव्या इतिहासाला कारणीभूत ठरल्या. २०२४ च्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून महायुतीमध्ये मोठा भाऊ या नात्याने भाजप जास्त जागांसाठी आग्रही आहे. जी परिस्थिती राज्यात आहे तीच जिल्ह्यात देखील आहे. त्यातच डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या भूमिके नंतर सिदखेडराजांमध्ये संभाव्य(?) होत असलेला बदल पाहता शिवसेना शिंदे गटाकडे असलेली ही जागा भाजप स्वतःकडे मागत आहे. तर जिल्हा मुख्यालयाच्या बुलढाण्यात सुद्धा ही जागा भाजपनेच लढवावी यासाठी भाजप श्रेष्टीकडे एक गट आग्रही आहे.
सिंदखेडराजा आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे विजयाचं समीकरण गेल्या १९९५ च्या निवडणुकीपासून कायम आहे. त्यात अपवाद हा २०१४ चा कारण त्यावेळी राजेंद्र शिंगणे हे जिल्हा बँकेच्या मुद्द्यावरून निवडणूक लढले नव्हते. आणि शिवसेनेला त्यावेळी पहिल्यांदा येथे डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या माध्यमातून भगवा फडकवता आला होता. डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे महायुतीमध्ये अजित पवार गटामध्ये सोबत असले तरी ते "तुतारी" हाती घेऊन "मोठ्या साहेबां"कडे परतणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे नाराजी नाट्य देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदार असलेले डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे महाविकास आघाडीकडे जाणार असल्याने मुळात "युती आणि आघाडी"च्या काळात शिवसेना लढत असलेली ही जागा आता महायुती मध्ये भाजप स्वतः लढवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी स्थानिक इच्छुकांनी देखील कंबर कसली आहे.
दुसरीकडे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे गणित याची पक्की खात्री कोणी देऊ शकत नाही. कारण सर्वाधिक शहरी भागामध्ये असलेला नोकरवर्ग आणि शांतता प्रिय असलेला हा मतदारसंघ अलीकडे राज्यभर चर्चेत आला. आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानांनी बुलढाणा कायम प्रसार माध्यमांमध्ये झळकत राहिला. त्यातच भाजपमध्ये असलेले माजी आमदार विजयराज शिंदे हे बुलढाण्याची जागा भाजपला सुटावी म्हणून आग्रह धरून आहेत. भाजपचा एक गट हा यासाठी मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.जोपर्यंत जागा वाटपाचे धोरण आणि उमेदवार जाहीर होत नाही; तोपर्यंत नेत्यांमधल्या या रस्सीखेच आणखी जोमात वाढणार आहे. सगळ्यांनीच "फील्डिंग" टाईट सुरू केली आहे. तर कुठला गोलंदाज कुणाला "बोल्ड" करेल आणि कोणाची " हिट विकेट" जाईल हे येणारा काळाच ठरवणार आहे. अर्थात या सामन्यांसाठी प्रेक्षक म्हणून असलेले मतदार हेच खरे "पंच" म्हणून भूमिका निभावणार आहेत हे नक्की.
भाजप जिल्हाध्यक्ष म्हणतात आम्ही एकसंघ; या दोन्ही जागा आम्हालाच मिळाव्यात...
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची विभाजन झालेले आहे.त्यांची शक्ती विभागली आहे.. भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सुटावा अशी आग्रही मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. सामाजिक समीकरणाच्या दृष्टिकोनातूनही सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ भाजपला सुटल्यास ७ ते ८ मतदारसंघात महायुतीला फायदा होईल. बुलढाण्याची जागा सुद्धा भाजपने मागितली आहे. कार्यकर्त्यांचा तसा आग्रह आहे अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे यांनी दिली आहे.