मोठी बातमी! बुलडाणा विधानसभा पूर्ण ताकदीने लढविणार! रविकांत तुपकर यांची घोषणा; मोताळ्यातील राजुर मध्ये झाली बैठक ; बुलडाणा विधानसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती...
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रविकांत तुपकर यांनी प्रथमच बुलढाणा विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी मोताळा व बुलढाणा तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत प्रथमतः लोकसभा निवडणुकीचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यानंतर रविकांत तुपकरांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. लोकसभा निवडणुकीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आपली परिस्थिती अत्यंत चांगली होती. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात जवळपास ३९ हजार मते आपल्याला अपक्ष असतांनाही मिळाली आहे. कोणतीही बॅनरबाजी नाही, प्रचाराचे पुरेपूर साहित्य नाही, वाहने नाही, पैसे नाहीत असे असतांनाही घरच्या भाकरी खाऊन कार्यकर्त्यांनी जिवापाड मेहनत घेतली. कोणता नेता नाही की पाठीराखा नाही केवळ रविकांत तुपकर या एका चेहऱ्याकडे पाहून बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, शेतमजुर व सर्वसामान्य जनतेने जवळपास ३९ हजार मते देऊन मोठा विश्वास दर्शविला आहे. ही परिस्थिती पाहता बुलढाणा विधानसभा मतदारसंघ आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आहे, त्यामुळे रविकांत तुपकर यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी रेटून धरली.
जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांच्या भावना आणि मागणी एक समान दिसून आली. यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, सत्ता, संपत्ती आणि बळाचा वापर करून आपल्याला तोडण्याचा सातत्याने प्रयत्न झाला, त्याचा अनुभव अनेक आंदोलनांमध्ये आलाच शिवाय लोकसभा निवडणुकीत देखील आला. परंतु कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, युवक आणि सर्वसामान्य जनतेचा भरघोस पाठिंबा आणि आशीर्वाद हीच माझी संपत्ती आणि हीच माझी खरी ताकद ठरली. शेतकऱ्यांसाठी व चळवळीसाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तब्बल अडीच लाख मते देऊन सर्वसामान्य जनतेने आपली ताकद दाखविली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी तन-मन-धनाने जीवाची बाजी लावून घेतलेली मेहनतच आज मला लढण्याचे बळ देत आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवू असे , रविकांत तुपकर यांनी सांगितले. तुपकरांच्या या घोषणेचे सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून स्वागत केले. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ही बैठक पार पडली. त्यांच्या घोषणेने सर्वांमध्ये एक नवा जल्लोष भरल्याचे देखील दिसून आले.
...तुपकरांना बुलढाण्यातून लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह..
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी रविकांत तुपकर यांनी लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. साम-दाम-दंड-भेद आणि सत्ता व पैशाच्या जोरावर सध्याचे वातावरण बिघडत आहे या परिस्थितीत भाऊ तुम्हीच पुरून उरू शकता म्हणून तुम्हीच उमेदवार पाहिजे असा, आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला होता. यावेळी जनतेच्या ताकदीवर विधानसभा लढवू अशी घोषणा तुपकरांनी केली. आपण स्वतः उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असे मात्र त्यांनी स्पष्ट सांगितले नाही. शेतकऱ्यांसाठी जीवाची बाजी लावून लढणारा, जन सामान्यांचाआवाज म्हणून काम करणारा तुमच्या मनातील चेहराच आपला उमेदवार राहील असे सांगत तुपकरांनी विधानसभेसाठी अप्रत्यक्षपणे दंड थोपटले.
अंगावर याल तर शिंगावर घेवू - तुपकर....
जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसतसे सत्ताधारी पक्षातील नेते आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव वाढवीत असल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्त्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवले जात आहे, शिवाय धमक्या देऊन दादागिरी देखील केली जात असल्याचे कार्यकर्ते सांगत आहे. परंतु आम्हीही सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज खपवून घेणार नाही, कुणीही अंगावर आले तर बिनधास्त शिंगावर घेवू, आम्ही शेतकऱ्यांचे बच्चे आहोत, लक्षात ठेवा, असा सज्जड इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.