मोठी बातमी! बुलडाण्याच्या बाजारात पिचकार्‍यांवर मोदी - योगीचे फोटो अन् कमळाचे चिन्ह! आचारसंहितेचा भंग नाही का? 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होळीच्या पूर्वसंध्येला आणि रंगपंचमीच्या एक दिवस आधी बाजारपेठ सजली आहे. धुलीवंदनाचा रंगोत्सव आणि लोकसभा निवडणुकीचा महोत्सव सोबतच आला आहे.केंद्रीय निवडणुक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. चौका चौकात लागलेले राजकीय पक्षांचे बॅनर, भूमिपूजनाच्या पाट्या झाकण्यात आल्या आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला बाजारात मात्र उघडपणे आचारसंहितेचा भंग होत असल्याचे बुलडाणा लाइव्ह च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
   धुलीवंदनाच्या निमित्ताने बाजारात भारतीय जनता पक्षाचे चिन्ह कमळ आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांचे चित्र असलेल्या पिचकाऱ्या विकण्यात येत आहेत. त्यामुळे हा आचार संहितेचा भंग नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
  आचारसंहिते नुसार सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षांचा प्रचार प्रसार होईल अशा गोष्टी बाळगता येत नाहीत असे असल्यास आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कार्यवाही केल्या जाते. मात्र अश्या पद्धतीने धुलीवंदनाच्या सणाचे औचित्य साधून पक्षाच्या प्रचाराचे माध्यम ठरत असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल का? याकडे लक्ष लागून आहे.
आचारसंहितेचे कारण दाखवत बुलडाणा शहरातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकावरील मावळ्यांनी हाती घेतलेल्या तुतारी झाकण्यात आल्या आहेत त्यामुळे पिचकारी प्रकरणात निवडणूक आयोग काय कारवाई करणार? पाहुया...