मोठी बातमी! चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी डॉ.संतोष वानखेडे! उपसभापती पदी राष्ट्रवादीच्या राम खेडेकरांना संधी;
देऊळगावराजात समाधान शिंगणे झाले सभापती! ठाकरेंच्या शिवसेनेचे दादाराव खार्डे उपसभापती
काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंच्या नेतृत्वात चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १७ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. आज पार पडलेल्या निवडणुकीत सभापती म्हणून डॉ.संतोष रमेश वानखेडे तर उपसभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राम खेडेकर यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. दुसरीकडे देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे समाधान भिकाजी शिंगणे तर उपसभापती पदी उद्घव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख दादाराव खार्डे यांची अविरोध निवड झाली. देऊळगाव राजा बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री तथा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनात १८ पैकी १५ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या.