मोठी बातमी! भक्ती महामार्ग रद्द करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकाऱ्यांना सूचना; मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात चिखली विधानसभा मतदारसंघातील विकास कामांवर चिंतन, अनेक प्रश्न मार्गी लागले;

आ. श्वेताताईंनी धरला होता बैठकीचा आग्रह....

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघातील विविध विषय संदर्भात काल,८ ऑगस्टला सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वाची बैठक झाली. आ. श्वेताताई महाले यांच्या आग्रहास्तव झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आपल्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन सिंदखेडराजा ते शेगाव हा भक्ती महामार्ग रद्द करा अशा थेट सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यासह चिखली विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे प्रश्नही या बैठकीत मार्गी लागले.
  चिखली, बुलडाणा तालुक्यासह जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागातील पंतप्रधान, रमाई, अल्पसंख्याक, मोदी आवास योजनेच्या घरकुलांचे हप्ते तातडीने वितरित करावे अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.
 चिखली नगरपालिका प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत मंजूर प्रकल्पांना राज्य व केंद्र शासनाचा उर्वरित निधी तातडीने देण्याची कार्यवाही होणार. सोबतच चिखली शहरातील ४५७ मंजूर, परंतु काही कारणांनी रद्द घरकुलांना पुन्हा मान्यता देण्याची कार्यवाहीसुद्धा होणार असल्याचे या बैठकीत निश्चित झाले.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात सन २०१६-१७ ते आजतागायत एकूण ४४१२१ लाभार्थ्यांच्या घरांना मंजुरी दिलेली असून त्यापैकी ३२२३२ लाभार्थ्यांनी घरे पूर्ण केली आहेत. सध्या ११८८९ घरे अपूर्ण असून त्यापैकी ५२६५ लाभार्थ्यांकडे घर बांधणीसाठी जागा उपलब्ध नसल्याने ती सुरुच होऊ शकली नाहीत. ही घरकुले सुरु करण्याच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
चिखलीत होणार ५० खाटांचे स्री रुग्णालय ..
चिखली येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आता ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय झाले आहे. परंतु ही दर्जावाढ अपुरी पडणार आहे. म्हणून ही दर्जावाढ १०० खाटांची करावी आणि यात ५० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयाची मागणी बैठकीत केल्याने महिला व बाल रुग्णालयाच्या प्रस्तावासह ट्रॉमा केअर सेंटरचाही प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत . त्यामुळे आता चिखली येथे लवकरच स्वतंत्र स्त्री रुग्णालयाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.
चिखलीतील रोहिदास नगर व एकता नगर झोपडपट्टीतील अतिक्रमण कायम करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कार्यवाही करावी. नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे व घरकुले देण्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बैठकीला विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.