मोठी बातमी! जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर आ. श्वेताताईंची सुरक्षा वाढवली! एस्कॉर्ट वाहन आणि ४ बंदुकधारी पोलिस सदैव राहणार श्वेताताईंच्या सुरक्षेत तैनात...
Feb 25, 2025, 12:06 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मागील आठवड्यात अज्ञात आरोपींनी आ. श्वेताताईंना जिवे मारण्याचे पत्र पोस्टाने पाठवले होते. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. चिखली पोलीस ठाण्यात या प्रकरणात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मात्र अद्याप पत्र पाठवणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही. मात्र असे असले तरी पोलिसांकडून आमदार श्वेताताईंच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. आधी आ. श्वेताताईंच्या सुरक्षेत एक सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात होता. आता जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरेंच्या आदेशाने श्वेताताईंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आ. श्वेताताईंना आता एस्कॉर्ट सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे आ. श्वेता ताईंच्या सुरक्षेत एका पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह, एस्कॉर्ट वाहन आणि ४ बंदुकधारी पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत..
मागील आठवड्यात शुक्रवारी आ. श्वेता ताईंना जीवे मारण्याचे पत्र धडकले होते. या पत्रातील भाषा अत्यंत क्रूर होती. या पत्रामुळे जनमानसातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत्या. चिखली विधानसभा मतदारसंघात हजारो कोटींची विकास कामे करून मतदारसंघाचा कायापालट करणाऱ्या आ. श्वेताताईंची सुरक्षा वाढवावी अशी मागणी जोर धरत होती. आता राज्य शासनाने आमदार श्वेताताई महाले यांची सुरक्षा वाढवली आहे. एक सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी यासह ४ पोलिस कर्मचारी आणि एस्कॉर्ट वाहन श्वेताताईंच्या सुरक्षित तैनात राहणार आहे...