BIG BREAKING कुणी म्हणे सिंदखेडराजा घ्या, कुणी म्हणे चिखली घ्या, कुणी म्हणे मेहकर घ्या, कुणी म्हणे बुलडाण्यातून लढा! 

* कार्यकर्त्यांच्या बैठकीत तुपकरांना विधानसभा निवडणूक लढण्याचा आग्रह!
* अखेर रविकांत तुपकरांनी घेतला मोठा "राजकीय" निर्णय....
 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आज,६ जुलै रोजी रविकांत तुपकर यांनी पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. बुलडाणा शहरातील गोलांडे लॉन्स येथे ही बैठक झाली. या बैठकीत रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. भाऊ आता थांबू नका, लोकसभा निवडणुकीत आपण भरपूर मते घेतली आहेत, आता थांबायचे नाही विधानसभा निवडणूक लढायचीच असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते यावेळेस हजर होते. कुणी मेहकर विधानसभेतून लढण्याचा आग्रह धरत होते तर कुणी सिंदखेडराजा विधानसभेतून, काही कार्यकर्त्यांनी चिखली, काहींनी बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून तुपकर यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. काही कार्यकर्त्यांनी रविकांत तुपकर यांनी एखाद्या पक्षात प्रवेश करून निवडणुक लढवावी असेही मत व्यक्त केले.अखेर बैठकीच्या शेवटी रविकांत तुपकर यांनी सर्व कार्यकर्त्यांची मते विचारात घेत मोठी राजकीय घोषणा केली.

  रविकांत तुपकर यांच्या भाषणाआधी कार्यकर्त्यांनी आपापली मते व्यक्त केली. यावेळी श्याम अवथळे यांचे भाषण चांगलेच गाजले. आपल्याला सभागृहात जाणे आवश्यक आहे .विधानसभा निवडणुकीत राजकीय निर्णय घेणे गरजेचे आहे. आपल्याला दोन दरवाजे खुले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा शिवसेना उद्घव ठाकरे हे दोन पर्याय सध्या आपल्यासमोर आहेत असे श्याम अवथळे म्हणाले. काहीही करा मात्र राजकीय निर्णय घ्याच असे श्याम अवथळे म्हणाले. विनायक सरनाईक यांनी आपण वेगळा पक्ष स्थापन करावा असे मत व्यक्त केले.
काय ठरलं? रविकांत तुपकर म्हणाले...
आपली लढाई विस्थापितांची लढाई आहे. सगळ्यांनी मनमोकळे पणाने बोलावं, तुमची मत लक्षात घेता यावी, झालेल्या चुका दुरुस्त करून पुढे जाता यावा यासाठी बैठकीचे आयोजन केल्याचे रविकांत तुपकर यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितले. ही लढाई तुमच्यामुळेच इथपर्यंत आली आहे असे तुपकर म्हणाले.तुम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्यामुळेच अख्ख्या महाराष्ट्रात बुलडाणा लोकसभेची निवडणूक गाजवू शकलो.
ज्यांनी मतदान केले त्यांचे धन्यवाद ज्यांनी मतदान केले नाही त्यांच्याबद्दल देखील माझ्या मनात कोणताही राग नाही असे तुपकर म्हणाले. आपण या निवडणुकीत नसतो तर कदाचित मतदानाची टक्केवारी कमी झाली असती, आपल्यामुळे या लढतीत रंगत आली. पक्ष नसतांना, पैसा नसतांना, सगळे पुढारी विरोधात असताना सामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली त्यामुळे सगळ्या पुढाऱ्यांनी तोंडात बोट घातली असे तुपकर म्हणाले. सामान्य घरातील पोरगा प्रस्थापितांच्या नाकात दम आणु शकतो हा संदेश बुलडाणा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेला असल्याचे ते म्हणाले. आणखी ५० - ६० हजार मते मिळवता आली असती तर थोड्याफार फरकाने आपण जिंकलोही असतो असे तुपकर म्हणाले. 
     काही आमदार आपल्याला २५ - ३० हजाराच्या पुढे धरत नव्हते. मात्र निकाल लागल्यानंतर त्यांच्या नाकात दम आला असे तुपकर म्हणाले. एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, आपल्याजवळ गमावण्यासारखे काहीच नाही. आपला माय - बाप वावरात जातो. त्यामुळे इकड कमी झालो, तिकड कमी पडलो याने निराश न होता जिथे कमी पडलो तिथे कशी उभारी घेता येईल याचा विचार करून पुढं जायचं असल्याचे तुपकर म्हणाले.
  ज्या पुढाऱ्यांनी आपल्याला प्रचंड विरोध केला त्यांच्या गावातच आपल्याला लीड आहे. अनेक पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या गावात आपण पुढे आहोत असे तुपकर म्हणाले. आपल्यामुळे नेत्यांना शेतकऱ्यांची ताकद कळल्याचे ते म्हणाले. आता यापुढे काय करायचं हे सगळ्यांच ऐकून पुढं जाऊ असे तुपकर म्हणाले.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांवर हल्लाबोल...
चिखली येथील नागरी सत्काराच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव माझ्यावर बोलले. प्रतापराव जाधवांनी माझ्या नादाला लागू नये.मी नंगा फकीर आहे. आतापर्यंत बुलडाणा, मुंबईत ,नागपुरात आंदोलने केली आता दिल्लीत आंदोलन करायला येऊ शकतो हे ध्यानात घ्या असे रविकांत तुपकर म्हणाले. केंद्रीय मंत्र्याला जर माझ्यावर १५ मिनिट बोलावं लागत असेल तर त्यांना झोपेतही मी दिसत असेल असा टोला तुपकर यांनी लगावला. ते कॅबिनेट मंत्रीही झाले , उपपंतप्रधान , पंतप्रधानही झाले तरी माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याला कामासाठी त्यांच्या दारात जायची वेळ येणार नाही,कारण माझ्या साथीदारांच्या पाठीशी मी छातीचा कोट करून उभा आहे असे रविकांत तुपकर म्हणाले. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याने पराभवाने खचून जाऊ नये, हिम्मत हारायची नाही असे तुपकर म्हणाले.
इथून पुढे प्रतिस्पर्धी उमेदवार तुमचे डोके उचकवण्याचा प्रयत्न करतील मात्र डोके शांत ठेवा अशा सूचना यावेळी तुपकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. गेल्या २० -२२ वर्षात शेतकऱ्यांची अनेक कामे केली. अजून बरीच कामे करायची आहेत. या कामातून समाधान मिळते म्हणून मी शेतकऱ्यांची कामे करतो, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून मी निराश नाही असे तुपकर बोलतांना म्हणाले.
काय कारवाई करायची ती खुशाल करा..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रदेशाची बैठक झाली. मला निरोप असल्याचे त्यांनी मीडियात सांगितले.मला कोणताही निरोप नव्हता. आता त्यांनी मला उत्तर देण्यासाठी कमिटीसमोर उभे राहायला सांगितले आहे. मी आधीच पत्र पाठवले आहे, त्या पत्राचे उत्तर मला अपेक्षित आहे. तुम्हाला काय कारवाई करायची ती करा असा इशाराच त्यांनी राजू शेट्टी यांना दिला. मला भाजपने उभे केले असा संभ्रम काहींनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसे खरचं असते तर मला खामगाव ,जळगाव जामोद मध्ये लीड मिळायला हवा होता ना असे तुपकर म्हणाले.
पुढे काय?
२२ वर्षाच्या प्रवासात जे निर्णय घेतले ते माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना विचारूनच घेतले. हा पराभव जो आपला झाला,त्याची जबाबदारी माझी आहे. मी या पराभवाला कुणालाही जबाबदार धरणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही साथ द्याल का? असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला यावेळी कार्यकर्त्यांनी एकमुखाने हुंकार भरला. बुलडाणा जिल्ह्यातल्या सहाही विधानसभा मतदारसंघात आपण उमेदवार उभे करणार आहोत अशी घोषणा रविकांत तुपकर यांनी केली. उद्यापासून स्वतंत्रपणे आपण तयारीला लागणार आहोत असे तुपकर म्हणाले. ६ विधानसभा मतदारसंघात उमेदवार जिंकण्यासाठी उभे करायचे आहेत अशी घोषणा तुपकर यांनी केली.स्वतः कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार यावर त्यांनी आजच्या कार्यक्रमात त्यांनी भाष्य केले नाही.