BIG BREAKING "मी मेलो तर चालतो, बाकीच्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे म्हणत शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले ! तीन दिवसांपासून हमीभाव केंद्रावर रखडली होती सोयाबीन खरेदी! सोमठाणा फाट्यावर खळबळ...
Jan 4, 2025, 15:15 IST
चिखली (ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. हमीभाव केंद्रावर तीन दिवसांपासून सोयाबीन पडून होती, सोयाबीन खरेदीसाठी विलंब लागत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. हमीभाव केंद्रावर उपस्थित इतर सहकारी शेतकऱ्यांनी वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील अहिल्याबाई सहकारी संस्थेच्या हमीभाव केंद्रावर हा प्रकार आज,४ जानेवारीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला. ज्ञानेश्वर दिनकर सावळे (रा. डोंगरशेवली, ता. चिखली) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार बारदाना उपलब्ध नसल्याने हमीभाव केंद्रावरील सोयाबीन खरेदी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रखडली होती. डोंगरशेवली येथील शेतकरी ज्ञानेश्वर दिनकर सावळे यांनी त्यांच्या शेतातील अंदाजे ५० क्विंटल सोयाबीन सोमठाणा येथील आम्ही भाऊ केंद्रावर आणली होती. मात्र गेल्या ३ दिवसांपासून सोयाबीन गाडीत तशीच पडून होती. सोयाबीन खरेदी होत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचा अखेर संयम सुटला. आज,४ जानेवारीच्या दुपारी त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ही बाब सहकारी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी ज्ञानेश्वर सावळे यांना रोखले यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी पोहोचले. याशिवाय शेतकरी नेते विनायक सरनाईक हेदेखील घटनास्थळी पोहोचले होते. वृत्त लिहिस्तोवर पुढील कारवाई सुरू आहे.
मी मेलो तरी चालतो...
मी मेलो तरी चालतो पण बाकीच्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे असे म्हणत ज्ञानेश्वर सावळे यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले. आमच्या मालाची यांना किंमत नाही, किती दिवस संयम ठेवायचा? आता संयम सुटला आहे असेही ज्ञानेश्वर सावळे यांनी म्हटले आहे