BIG BREAKING दिलजमाई! खा.प्रतापराव जाधव, विजयराज शिंदेंची संयुक्त पत्रकार परिषद! खा.जाधव म्हणाले, आता एकदिलाने काम करू!
विजयराज शिंदे म्हणाले, "त्यांनी जबाबदारी दिली तर..."
Apr 8, 2024, 16:20 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज दिवसभरात रंजक राजकीय घडामोडी घडल्या. भाजप नेते विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर खा.प्रतापराव जाधव यांनी विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन भेट घेतली. आ. श्वेताताई महाले पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे यावेळी उपस्थित होते. तब्बल १ तास चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलतांना खा.जाधव म्हणाले की, आमची महायुतीची समन्वयाची बैठक झाली. लहान मोठे सर्व घटक पक्ष मिळून एकमताने मोदींचा ४०० पार चा नारा यशस्वी करण्याचे नियोजन आहे . आमचे मनोमिलन झाले आहे, आम्ही सोबत चहा घेतला..आता एकदिलाने आम्ही लोकसभेचे काम करणार आहोत असे खा.जाधव यावेळी म्हणाले.
खा.जाधव आणि आमदार गायकवाड यांच्यातील मनोमिलन केव्हा होईल या प्रश्नावर खा.जाधव म्हणाले की "आम्ही आ.गायकवाड आणि विजयराज शिंदे यांचे मनोमिलन करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. राजकारण करीत असताना आपले काही धुऱ्याचे भांडण नसते, त्यामुळे कुणी कुणाबद्दल अपशब्द बोलू नये, अपशब्दांचे कुणीही समर्थन करणार नाही असे त्यांनी आ.गायकवाड व विजयराज शिंदे यांच्या वादावर बोलतांना सांगितले. घरात भांड्याला भांड लागल की थोडाफार आवाज येत असतो त्यामुळे हे आमचं घरघुती भांडण आहे, आमची युती काही आजपासून नाही , अनेक निवडणुका आम्ही युतीत लढलो आहोत, आमच्या सख्या भावांच्या भांडणात कुणी नाक खुपसण्याची कुणाची गरज नाही असे खा.जाधव म्हणाले.
आपली लढत कुणासोबत यावर बोलतांना ते म्हणाले की लोकसभा मतदारसंघात ६ आमदार महायुतीचे आहे, महायुतीचा उमेदवार म्हणून १५ वर्षांपासून मी निवडून आलो आहे त्यामुळे या लढतीत आमच्या स्पर्धेत कुणीही नाही असे खा.जाधव म्हणाले.
विजयराज शिंदे म्हणाले...
खा. प्रतापराव जाधवांचा प्रचार कराल का? या प्रश्नावर विजयराज शिंदे म्हणाले की, त्यांनी प्रचाराची जबाबदारी माझ्यावर सोपवली तर मी नक्की करील..