BIG BREAKING ठरलं रे भो..! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घ्या! सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश;
महिनाभराच्या आतच अधिसूचना प्रसिद्ध होणार... जिल्हा परिषद, नगरपालिका इच्छुकांची धाकधुक वाढली
Updated: May 6, 2025, 15:37 IST
बुलडाणा( कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात महत्त्वाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ५ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबल्या आहेत. हे लोकशाही विरोधी आहे असा ठपका ठेवत चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस सरकारला दिले आहेत.. सप्टेंबरच्या आतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत...
राज्यभरातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. बुलढाणा जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सर्वच नगरपालिकांच्या निवडणुका २०२२ पासून प्रलंबित आहेत. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण चालू होते. मात्र २०२२ च्या आधी ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती तशाच स्थितीत निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. ४ आठवड्यांच्या आत निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करावी असेही न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्यांची धाकधूक वाढली आहे.