आ. श्वेताताईंमुळे शेतकऱ्यांचं भलं!अखेर भक्तिमार्ग केला शासनाने रद्द! आमदार श्वेताताईंच्या पाठपुराव्याला मोठे यश...
Oct 15, 2024, 17:38 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा ते शेगाव हा प्रस्तावित १०९ किलोमीटरचा भक्तिमार्ग राज्य शासनाने अखेर रद्द केला आहे. सिनखेडराजा, देऊळगाव राजा, मेहकर, चिखली आणि खामगाव या तालुक्यामधून जाणाऱ्या या मार्गाबद्दल शेतकरी वर्गामध्ये नाराजीची भावना होती. हा मार्ग झाल्यास सुपीक जमीन मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना गमावावी लागणार होती. त्यामुळे या मार्गाला विरोध सुरू झाला होता. या लोकभावनेची दखल घेऊन आ. श्वेताताई महाले यांनी राज्य शासनाकडे हा मार्ग रद्द करावा यासाठी पाठपुरावा केला. विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न मांडून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र सादर करून त्यांनी आपली मागणी लावून धरली. अखेर आ. महाले यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने भक्ती मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला व या संदर्भातला शासन आदेश काल दि. ऑक्टोबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढण्यात आला आहे.
राजमाता जिजाऊ माॅ साहेबांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा व संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे समाधी स्थळ असलेल्या शेगाव या दोन पर्यटन स्थळांना जोडणारा तसेच समृद्धी महामार्गाला संलग्न असणारा १०९ किलोमीटर लांबीचा हा संकल्पित भक्तिमार्ग त्याच्या घोषणेपासूनच वादात अडकला होता.
या भक्ती महामार्गामध्ये आपली सुपीक जमीन जाणार असल्याने शेतकऱ्यांकडून या मार्गाला विरोध सुरू झाला होता. चिखली मतदारसंघात देखील अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग रद्द करावा अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांच्याकडे केली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पळसखेड दौलत येथे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी बोलताना आ. श्वेताताई महाले यांनी सदर भक्ती मार्ग रद्द करण्याचे ग्वाही दिली होती. याशिवाय वेळोवेळी त्यांनी जाहीरपणे या महामार्गाच्या बद्दल आपली भूमिका स्पष्ट केली होती.
आ. महालेंनी केला पाठपुरावा...
भक्ती महामार्ग रद्द व्हावा ही शेतकऱ्यांची जनभावना लक्षात घेऊन आ. श्वेताताई महाले यांनी राज्य शासनाकडे याबद्दल पाठपुरावा केला. विधानसभेत प्रश्न उपस्थित करून तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची या मार्गाबद्दलची तीव्र भावना त्यांनी पोहोचवली होती. आ. महाले यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून राज्य शासनाने भक्ती मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काल दि. १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दलचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
शेतकऱ्यांनी मानले श्वेताताईचे आभार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाही धन्यवाद
शेतकऱ्याची लेक असलेल्या श्वेताताई महाले या नेहमीच बळीराजाच्या प्रश्नांबद्दल संवेदनशील असतात. भक्ती मार्गाचा होत असलेला शेतकऱ्यांचा विरोध त्यांनी राज्य शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवला व हा मार्ग रद्द करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली त्याबद्दल चिखली मतदारसंघासह जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकडून आ. श्वेताताई महाले यांचे आभार मानले जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील धन्यवाद दिले आहेत.