मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी "रात्रीस खेळ चाले"! शिवसेनेचे सगळे खासदार पोहचले..पण, खासदार प्रतापराव जाधव गैरहजर..! वाचा काय आहे कारण..
May 25, 2023, 12:05 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभेच्या निवडणुका आता वर्षभरापेक्षा कमी कालावधीवर येऊन ठेपल्यात. महाविकास आघाडीत जागावाटपावर चर्चा सुरू झाली असली तरी भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेत अद्याप तशी चर्चा नाही. मात्र असे असले तरी भाजपा आणि शिवसेनेत यावर पक्षांतर्गत खलबते नक्कीच सुरू झालेली असणार. लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपा आणि शिवसेना एकत्र नांदले तर लोकसभा निवडणुका एकत्रित लढल्या जाईल. त्यामुळे कुणी किती जागा लढवायच्या हे दोन्ही पक्षांना एकत्रित बसून ठरवावे लागेल. मात्र त्याआधी भाजप प्रमाणेच एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना देखील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या शिवसेना खासदारांची बैठक काल,२४ मार्चच्या रात्री मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर तसेच लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना नेते प्रतापराव जाधव मात्र या बैठकीला हजर नव्हते.
खासदार प्रतापराव जाधव ६ दिवसांसाठी तीन राज्यांच्या शासकीय दौऱ्यावर आहेत. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष असलेले खा.जाधव समितीच्या बैठकांसाठी पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालय या ३ राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. काल,२४ मे रोजी ते कोलकात्ता येथे होते आजही कोलकत्ता येथेच आहेत. उद्या आणि परवा ते आसामच्या गुवाहाटीला जाणार आहेत त्यानंतर मेघालयातील शिलाँग येथे ते जाणार असल्याचे त्यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलताना सांगितले. खासदारांच्या बैठकीचा निरोप आपल्याला होता मात्र बैठकीला हजर राहता येणार नसल्याचे आपण कळवले होते, तशी परवानगी देखील घेतल्याचे त्यांनी सांगितले.