बुलढाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपात जाणार जाणार तसेच काँग्रेस सोडणार सोडणार अशी ज्यांच्याबद्धल मागील एक वर्षांपासून चर्चा सुरू होती ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर आज 12 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली! हे कधीना कधी होणारच होते ते आज झाल्याने राज्यातील राजकारण्यांना याचे काही नवल वाटले नाही.
बुलढाणा जिल्ह्यासह जिल्ह्यातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेले , हे ऋणानुबंध जोपासणारे हे ज्येष्ठ काँग्रेसी नेते काँग्रेस संकटात असताना गेल्याने जिल्ह्यातील काँग्रेसच्या मंडळींना मात्र धक्का बसला आहे.
आदर्श घोटाळ्या मुळे अशोक चव्हाण यांच्या स्वच्छ प्रतिमेला डाग लागला, तो अगदी 'एरियल, सर्फ एक्सेल' मुळे सुद्धा धुवून निघाला नाही. त्यामुळे आता ते शुद्धीकरण चा वसा घेतलेल्या भाजपच्या आश्रयाला गेलेत! आता ते चकाचक होऊन निघतील अशी प्रतिक्रिया बुलढाणा जिल्ह्यात उमटली आहे. युवा नेते, आमदार, विविध खात्यांचे मंत्री आणि मुख्यमंत्री असा राजकीय चढता आलेख अशोक चव्हाण यांचा राहिला आहे. याकाळात त्यांचे बुलढाणा जिल्हा व काँग्रेस वासीयांशी दीर्घ काळ सुमधुर संबंध राहिले . विधानसभा , लोकसभा निवडणूक, वा काँग्रेसचा मोठा कार्यक्रम असो वा अगदी खाजगी कार्यक्रम असो त्यांनी जिल्ह्याला वेळोवेळी भेट दिली. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत त्यांचे दीर्घकाळ ऋणानुबंध राहिले. ज्याला निष्ठावान नेत्यांचा आदर्श मानले त्या नेत्याने आपल्याला सर्व काही भरभरून देणारा पक्ष संकटात असताना त्याला सोडल्याने जिल्ह्यातील काँग्रेसच्या मंडळींना मोठा धक्का बसला आहे...
काँग्रेस अध्यक्ष राहुल बोन्द्रे म्हणतात, सत्ताधाऱ्यांच्या दवाबामुळे राजीनामा..
सत्ताधाऱ्यांच्या सततच्या दवाबतंत्रामुळे , माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी दिली आहे मात्र त्यांच्या राजीनाम्याचा बुलढाणा जिल्हा काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नसून कोणीही पक्षत्याग करणार नाही अशी खात्री त्यांनी बोलून दाखविली.
ज्येष्ठनेते अशोक चव्हाण यांनी आज सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा पत्र पाठविले. या पार्श्वभूमीवर विचारणा केली असता जिल्हाध्यक्ष बोन्द्रे यांनी वरीलप्रमाणे 'सावध' प्रतिक्रिया दिली. मागील अनेक महिन्यापासुन त्यांच्या पक्षत्याग व भारतीय जनता पार्टीत प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. तसेच त्यांच्या विरुद्ध काही प्रकरणा संदर्भात कारवाईची चर्चा देखील सुरू होती. मात्र ते सत्ताधाऱ्यांच्या दवाबाला बळी पडतील, पक्षत्याग करतील असे वाटत नव्हते, असे राहुल बोन्द्रे म्हणाले. मात्र आता त्या चर्चा दुर्दैवाने खऱ्या ठरल्या आहे. मात्र चव्हाण यांच्या जाण्यामुळे किमान जिल्हा काँग्रेसवर तरी काही परिणाम होणार नाही अशी खात्री जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी बोलून दाखविली.