आज संग्रामपुरात खोऱ्याने अर्ज; उद्या मोताळ्यात जेसीबीने!
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः येत्या 29 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या मोताळा व संग्रामपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या नामांकन प्रक्रियेसाठी आजचा दिवस संमिश्र व मजेदार ठरलाय! संग्रामपूरमध्ये आज सोमवारी (दि. 6) खोऱ्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असताना मोताळ्यात कमी अर्ज दाखल झाले. मात्र उद्या नामांकनाची अंतिम मुदत असल्याने मोताळ्यात विक्रमी संख्येने अर्ज दाखल होणार हे उघड आहे.
प्रत्येकी 17 सदस्यीय म्हणजे एकूण 34 जागांसाठी या 2 नगरपंचायतींमध्ये लढती रंगणार आहेत. या लढती सर्व पक्षांची कसोटी तर महाविकास आघाडी व भाजपा यांच्यात नजीकच्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, 13 पंचायत समित्या व 9 नगरपालिकांच्या रणसंग्रामाची रंगीत तालीम समजली जात आहे. यामुळे या निवडणुकीचे महत्त्व वाढले आहे. 1 डिसेंबरपासून नामांकनास सुरुवात झाली असली तरी 3 डिसेंबरसून धीमी सुरुवात झाली. 3 डिसेंबरला मोताळ्यात 4 अर्ज दाखल झाले. आज सोमवारी 13 अर्ज दाखल करण्यात आले. या तुलनेत आज 6 तारखेला संग्रामपुरात खोऱ्याने म्हणता येईल इतके म्हणजे 36 जणांनी उमेदवारी दाखल केली.
वाॅर्ड क्रमांक 10 वगळता इतर 16 वाॅर्डांमधून अर्ज सादर करण्यात आले असून त्याचा तपशील असा ः वाॅर्ड 1 मध्ये 3, 2 मध्ये 1, 3 मध्ये 3, 4 मध्ये 2अर्ज, 5 मध्ये 2, 6 वाॅर्डमध्ये 2, 7 मध्ये 4 अर्ज , 8 मध्ये 2, 9 मध्ये 2, 11 मध्ये 3, 12 मध्ये 2, 13 मध्ये 2, 14 मध्ये 1, 15 मध्ये 2, 16 मध्ये 3 तर वाॅर्ड 17 मध्ये 2 जणांनी अर्ज दाखल झाले. एकाच दिवशी तब्बल 36 अर्ज दाखल झाल्याने चुरस दिसून आली. अर्थात उद्या अंतिम दिवशी मोताळा प्रमाणेच संग्रामपूर मध्येही मोठ्या संख्येने अर्ज दाखल होणार हे निश्चित.