अन् सगळा गेम उलटा झाला! विजयराज शिंदेंना आजघडीला पश्चाताप होत असेल! संयम ठेवला असता तर आज उबाठा लोकसभेचे उमेदवार असते..
Mar 21, 2024, 10:29 IST
बुलडाणा(अभिषेक वरपे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजकारणात संयम खूप महत्वाचा असतो..खूप काही मिळाल्यानंतर एखाद्या वेळेस काही मिळालं नाही तर पुढाऱ्यांची चीड चीड होते, मग ते अचानक वेगळा निर्णय घेतात, या पक्षातून त्या पक्षात जातात..तिथे काही मिळत का ते पाहतात, पण कालांतराने वेळ बदलते, आधी जिथे होतो तिथेच राहिलो असत तर बरं झालं असतं असंही वाटू लागतं..एकेकाळी शिवसेनेचा कद्दावर गडी अशी ओळख असलेल्या माजी आमदार विजयराज शिंदेंनाही आता तसंच वाटतं असावं. साधा व्यवसाय करणारा एक सामान्य शिवसैनिक ते तीन वेळा आमदारकी..काय नाही दिलं शिवसेनेने? पण २०१९ ला अंतर्गत गटबाजीने तिकीट गेलं अन् त्यांनी वेगळा निर्णय घेतला. आजघडीला जर ते मूळ शिवसेनेत असते तर कदाचित उबाठा शिवसेनेकडून बुलडाणा लोकसभेचे उमेदवार होऊ शकले असते. ज्यांच्यामुळे २०१९ ला विधानसभेचे तिकीट कटले त्या खा.प्रतापराव जाधवांविरोधात लढून बदला घेण्याची संधी मिळाली असती..पण काय.. संयम ठेवला नाही अन् सगळा मेळ हुकला अशी स्थिती आता माजी आमदार शिंदेंची झाली आहे.
खरंतर विजराज शिंदेंना ५ वेळा शिवसेनेने तिकीट देऊन विधानसभा लढण्याची संधी दिली. १९९९ आणि २०१४ सोडले तर ३ वेळेस त्यांना आमदारकी मिळाली. २०१९ ला खा. जाधवांच्या कृपाशीर्वादाने संजय गायकवाडांना उमेदवारी मिळाली अन् ५ वेळा तिकीट देणाऱ्या, ३ वेळेस आमदार करणाऱ्या शिवसेनेने आपल्यावर अन्याय केल्याची भावना शिंदेंची झाली. वेळेवर वंचित मध्ये जाऊन मेळ जमवण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली पण आमदारकीपासून वंचित राहिले. पुढे शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाल्याने त्यावेळी मुळ शिवसेनेत असणाऱ्या खा.जाधव ,आ.गायकवाड यांना विरोध करता येईल,भविष्यात भाजपकडून लोकसभा किंवा विधानसभा लढवता या हेतूने विजयराज शिंदेंनी भाजपात प्रवेश केला.
सगळा गेम उलटा झाला..
भाजपने शिंदेंना प्रदेश कार्यकारिणीत घेतले. भाजपात आल्या आल्या शिंदेंनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात, स्थानिक खासदार आमदारांच्या विरोधात रान पेटवले. एकदा तर आ.गायकवाड पुत्रांनी त्यांच्यावर हल्ला चढवून डोळा देखील फोडला. लोकसभेला खा.जाधवांच्या विरोधात विजयराज शिंदेंना उतरविण्याचा भाजपचा प्लॅनही त्यावेळी असावा. शिंदे देखील त्यादृष्टीने जिल्हाभर फिरत होते.
मात्र काही दिवसांत काळ पुन्हा बदलला..शिवसेनेची दोन शकले झाली, बुलडाण्याचे खासदार, दोन आमदार भाजपसोबत जाणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी झाले, अन् महायुतीच्या बैठकीत विजयराज शिंदेवर खा.प्रतापराव जाधवांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आली. ते तर जाऊद्या..सध्या विजयराज शिंदे भाजपचे बुलडाणा लोकसभा निवडणूक प्रमुख आहे. बुलडाणा लोकसभेची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटल्यात जमा आहे. त्यांच्याकडून उमेदवारी विद्यमान खा.प्रतापराव जाधवांनाच मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कट्टर विरोधक असलेल्या खा. जाधवांच्या विजयासाठी लोकसभा निवडणूक प्रमुख या नात्याने विजयराज शिंदेंना प्रयत्न करावे लागणार आहेत.( ते करतील की नाही,हे त्यांच त्यांना माहीत).
तर आज विजयराज शिंदे झाले असते उबाठा चे लोकसभा उमेदवार...
विजयराज शिंदेंनी २०१९ ला संयम दाखवला असता, वंचित मध्ये व त्यानंतर भाजपमध्ये गेले नसते तर आज त्यांच्यासाठी सोन्याचे दिवस असते. खा.जाधव आणि आ.गायकवाड शिंदेगटात गेल्याने विजयराज शिंदे मूळ शिवसेनेत राहिले असते. निष्ठावान शिवसैनिक या नात्याने तेच लोकसभेसाठी प्रमुख दावेदार असते. सध्या प्रबळ उमेदवाराच्या शोधात असणाऱ्या उध्दव ठाकरेंनी विजयराज शिंदेंची उमेदवारीही जाहीर केली असती..पण केव्हा? जर संयम ठेवला असता तर.....