बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या संकल्पनेतून बुलडाणा येथे निघालेला आक्रोश मोर्चा वादळी ठरला.. त्याहीपेक्षा वादळी ठरले ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे भाषण..त्यांच्या नेहमीच्या शैलीत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला आडव्या हाताने घेतले..विद्यमान आमदारांवर देखील त्यांनी भाषणातून प्रहार केला.. थेट उपस्थित गर्दीच्या मनाला हात घालत त्यांनी अतिवृष्टीचे पैसे मिळाले का? पिक विमा मोबदला मिळाला का ? अशी हाक शेतकऱ्यांना दिली तर गर्दीतून उत्तर आले नाही... या हाकेला पुढे जात दानवे म्हणाले की, शेतकरी मेला पाहिजे असं महायुती सरकारच धोरण आहे. करोड रुपयांचे कर्ज बुडवून पळून जाणाऱ्यांना हे सरकार साथ देते, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही.
५० खोके वाल्यांना पैसे द्यायला यांच्याकडे पैसे आहेत पण शेतकऱ्यांना द्यायला नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. पिकाला भाव नाही, पिक विमा नाही, सरकारला याची लाज वाटली पाहिजे असे दानवे म्हणाले. इथला आमदार स्वतःला धर्मवीर म्हणून घेतो; तो तर गद्दार आहे.
कमिशन खोरी मध्ये गुंतलेले हे वाचाळवीर असून यांच्या जिभेला काही हाड ! अशी थेट टीका दानवे यांनी केली. पोलिसांनी देखील शेपूट घातलेले असल्याचे म्हणत रीटा उपाध्याय नावाच्या महिलेची जमीन हडपलेली आहे. ती महिला न्याय मागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आपण आहोत , जिल्हाधिकारी यांनी त्या बाईची जमीन मोजून दिली पाहिजे. दोन महिने थांबा सरकार बदलणार आहे असा दम देखील दानवे यांनी भरला. लाडक्या बहिणीची घोषणा करतात , खोटे आश्वासन देतात. आज तेल, तूरडाळ यांचे भाव काय आहेत? गॅस चारशे रुपये होता ,तो आज अकराशे रुपये आहे. एकीकडे बहिणी सुरक्षित नाहीत. आज त्यांना संरक्षणाची गरज आहे.कायदा व सुव्यवस्थेची धिंडवडे निघाले असून या गद्दार सरकारला पराभूत करावंच लागेल, असेही अंबादास दानवे म्हणाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा म्हटले होते की एकही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही. बुलढाणा जिल्ह्यात ११५ आत्महत्या झाल्या आहेत. सोयाबीन, कापसाचे भाव काय आहेत. सोयाबीनला दहा हजार रुपयाचा भाव असावा अशी मागणी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ते स्वतःची मागणी देखील विसरले आहेत का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला काहीही देणे -घेणे नाही अशी टीका दानवे यांनी केली. जालिंदर बुधवत यांनी १५१ गावात मशाल यात्रा काढली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हा मोर्चा अति विराट स्वरूपाचा असून १५१ गावात गेलेली मशाल, ही गावे आणि बुलढाणा शहर यापूर्ती मर्यादित राहणार नाही. ही मशाल मुंबईत गेल्याशिवाय थांबणार नाही; विधानसभेवर निष्ठावंतांचा भगवा फडकणार असे सूचक वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले.
जालिंदर बुधवत म्हणाले...
जालिंदर बुधवत यांनी सुरुवातीला मोर्चाच्या आयोजनाची भूमिका विषद केली. शिवसेना ही सत्तेसाठी नाही तर समाजासाठी आहे. झोपी गेलेल्या सरकारला जाग करण्याचं काम या मोर्चातून करायचा आहे. आज शेतकऱ्यांची अवस्था कठीण आहे. युवकांना रोजगार नाही, महिला सुरक्षित नाहीत असे सांगून सरकारविरुद्धचा आपला रोष व्यक्त केला.
नरेंद्र खेडेकर म्हणाले..
प्राध्यापक खेडेकर यांनी सरकारने लाडका बहीण लाडका भाऊ या सोबतच "लाडका वाचाळवीर" अशी देखील योजना आणावी. त्यामध्ये संभाजीनगरचा शिंदे गटाचा एक शिरसाट, राष्ट्रवादी अजित दादा सोबत असलेले मिटकरी, नारायण राणेंचा पोरगा , बुलढाण्याचा आमदार यांच्यात स्पर्धा घेतली तर बुलढाण्याचाच गद्दार जिंकेल अशी उपरोधिक कोपरखळी मारली. चिंता करू नका.बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकदा आमदार झालेला माणूस दुसऱ्यांदा आमदार सलग होत नाही असे सांगितले. जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात निघालेला हा शेतकऱ्यांचा मोर्चा सरकारला धडकी भरवणारा आहे असे खेडेकर म्हणाले.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राज्यपाल यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.