राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर चिखलीत झळकले पोस्टर! ना ये राहुल ,ना ये राहुल...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात सध्या चिखलीच्या राजकारणाची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंनी भाजपच्या श्याम वाकदकरांना मारहाण केली होती. त्यानंतर राहुल बोंद्रेंच्या विरोधात दरोड्याचे कलम लावून पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी राहुल बोंद्रेंना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. जिल्हा काँग्रेससह महाविकास आघाडी राहुल बोंद्रेंच्या समर्थनार्थ उभी राहिली होती तर दुसरीकडे आ. श्वेताताई महाले यांनीही माध्यमांसमोर राहुल बोंद्रेंना इतिहासाची आठवण करून मतदारसंघातील भावांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. चिखलीत अजूनही याच प्रकरणाची चर्चा सुरू असताना आता नवीन पोस्टर झळकलेत. राहुल बोंद्रे यांच्या समर्थकांनी लावलेल्या या पोस्टरची तुफान चर्चा सुरू झालीय.
 

मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. चिखलीत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे हेसुद्धा आज रस्त्यावर उतरले होते. केंद्र सरकार करीत असलेल्या दडपशाहीला आम्ही घाबरणार नसल्याचे बोंद्रे म्हणाले. दरम्यान आज,२४ मार्चच्या सायंकाळी चिखलीत काही पोस्टर झळकले. "ना ये राहुल डरेगा...ना ये राहुल झूकेगा" असे या पोस्टर वर लिहिण्यात आले असून राहुल गांधी आणि राहुल बोंद्रे यांचे फोटो या पोस्टरवर आहेत. या पोस्टरला श्याम वाकदकर मारहाण प्रकरणाचा संदर्भ असल्याची खमंग चर्चा आता चिखलीत रंगली आहे. 
     
भाऊंचे जरा चुकलेच..!!

राहुल बोंद्रे यांनी श्याम वाकदकरांना मारहाण केल्यानंतर चिखलीच्या चाय कट्ट्यांवर हा मुद्दा चांगलाच चघळला गेला. मारहाणीनंतर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांवर वेगवेगळी मतातंरे असली तरी भाऊंनी रस्त्यावर  उतरून मारहाण करणे चुकलेच असा सूर बहुतांश जणांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे अडचणीत सापडलेल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी कसे उभे रहायचे हे या प्रसंगातून आ. श्वेताताईंनी दाखवून दिल्याचे लोक बोलू लागलेत.