राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पिक विमा जमा होण्यास सुरुवात!रविकांत तुपकरांच्या एल्गार महामोर्चा, अन्नत्याग व मंत्रालय ताबा आंदोलनाचा पहिला रिझल्ट!तुपकरांचे उद्या जिल्ह्यात आगमन;

सर्वप्रथम सोमठाण्यात जावून शेतकऱ्यांशी साधणार संवाद

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. जिल्ह्यात निघालेली 'एल्गार रथयात्रा' त्यानंतर 'एल्गार महामोर्चा', चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन आणि २८ व २९ नोव्हेंबर रोजी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी थेट मुंबईत हजारो शेतकऱ्यांनी दिलेली धडक, यामुळे सरकार नरमले, २९ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविकांत तुपकरांच्या आंदोलनातील मागण्यांबाबत बैठक झाली आणि त्या बैठकीत सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या होत्या. त्यात शेतकऱ्यांच्या  खात्यात अग्रीम पिकविम्याची रक्कम जमा करण्याच्या मागणीचा ही समावेश आहे.  त्यानुसार राज्यातील व बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पिकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचा हा पहिला रिझल्ट असल्याचे मानल्या जात आहे.
 

                                           जाहिरात 👆

तुपकर यांनी २८ व  २९ नोव्हेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांसह मुंबईत धडक दिली होती. शेतकऱ्यांचे हे वादळ पाहता सरकारने रविकांत तुपकरांना चर्चेचे निमंत्रण दिले. मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सरकारसोबत झालेल्या बैठकीत रविकांत तुपकर, आ.डॉ.राजेंद्र शिंगणे व आ.डॉ.संजय कुटे यांनी पिकविम्याचा विषय ताकदीने लावून धरला होता. नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पिकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी रविकांत तुपकर यांनी या बैठकीत लावून धरली होती. त्याला यश आले असून शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात ४९ लाख ५ हजार ०३२  शेतकऱ्यांना २,०८६ कोटी ५४ लक्ष रुपये अग्रीम पिकविमा म्हणून मंजूर झाले आहे व त्याचे वाटप देखील चालू झाले आहे. बुलडाणा जिल्ह्याचा विचार करता  जिल्ह्यातील ३६,३५८ शेतकऱ्यांना अग्रीम पिकविमा म्हणून १८ कोटी ३९ लाख रुपये  मंजूर झाले असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.  रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठी जीव धोक्यात घालून आंदोलन केले त्याची फलित आता दिसून येत आहे. आंदोलनाचा पहिला रिझल्ट म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पिकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी मिळाला आहे.

 ..तर AIC कंपनीचे कार्यालय जागेवर ठेवणार नाही :  रविकांत तुपकर

राज्यात ४९ लाख ५ हजार ०३२  शेतकऱ्यांना २,०८६ कोटी ५४ लक्ष रुपये अग्रीम पिकविमा म्हणून मंजूर झाले आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याला मंजूर झालेली १८ कोटी ३९ लाख अग्रीम पिकविम्याची रक्कम ही सर्वात कमी आहे, त्यामुळे सरकारने दिलेला शब्द पाळून १ महिन्याचा आत १००% फायनल रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा मुंबईतील AIC कंपनीचे कार्यालय जागेवर ठेवणार नाही, असा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

तुपकरांचे उद्या जिल्ह्यात आगमन; सर्वप्रथम सोमठाण्यात जावून शेतकऱ्यांशी साधणार संवाद..

सोयाबीन-कापूस आंदोलनाचे प्रणेते रविकांत तुपकर हे मुंबईतील रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर आज प्रथमच जिल्ह्यात परतणार आहेत. ज्या गावातून त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते, त्या चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे त्यांचे आगमन होणार आहे. सोयाबीन-कापूस दरवाढीचा प्रश्न, पिकविम्याची रक्कम, दुष्काळाची मदत यासह शेतकरी-शेतमजूरांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी गेल्या महिनाभरापासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर  त्यांनी पाच नोव्हेंबर पासून संतनगरी शेगाव येथून जिल्ह्यातील एल्गार रथयात्रेची सुरुवात केली. या रथयात्रेचा समारोप २० नोव्हेंबर रोजी एल्गार महामोर्चाने करण्यात आला. हा मोर्चा आजवरच्या सर्व मोर्चाचे रेकॉर्ड मोडणारा असा रेकॉर्ड ब्रेक मोर्चा ठरला. त्यानंतर तुपकरांनी मुंबईतील मंत्रालयाचा ताबा घेण्याचा गंभीर इशारा दिला होता. त्यानंतर बुलडाणा शहर पोलिसांनी तुपकरांना बळजबरीने अटक केली होती. तुपकर यांच्यावर झालेल्या या कारवाईचे पडसाद राज्यभर उमटले.  ठिकठिकाणी आंदोलने झाली.  दरम्यान न्यायालयाने रविकांत तुपकर यांची अटक नियमबाह्य असल्याचे सांगत त्यांची मुक्तता केली. परंतु त्याच क्षणापासून रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. चिखली तालुक्यातील सोमठाणा हे गाव आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले.  त्यानंतर हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन रविकांत तुपकर २८ नोव्हेंबर रोजी मुंबईकडे रवाना झाले. २९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांचे हे वादळ मुंबईत धडकले. तुपकरांच्या या  आंदोलनामुळे संपूर्ण राज्यात  खळबळ उडाली होती. मुंबईसह राज्यभरातील पोलीस यंत्रणा तसेच प्रशासन अलर्ट झाले होते.  अखेर सरकारने नमती बाजू घेत रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी बोलावले व या बैठकीत बहुतांश मागण्या मान्य झाल्या. सोळा दिवसांची 'एल्गार रथयात्रा' त्यानंतर महामोर्चा आणि सलग पाच दिवस अन्नत्याग यामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती चांगलीच खालावली होती. त्यांना मुंबई येथील सैफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून प्रकृती स्थिर आहे, त्यामुळे त्यांनी रुग्णालयातून सुट्टी देण्याची विनंती रुग्णालय प्रशासनाला केली आहे. त्यानुसार रुग्णालयातून सुट्टी होताच ते बुलडाण्याकडे रवाना होणार आहेत. ज्या गावातून आंदोलनाला मोठे बळ मिळाले त्या सोमठाणा येथे शेतकरी,  शेतमजूर, तरुण आणि महिला यांचे आभार मानण्यासाठी रविकांत तुपकर पोचणार आहेत.  सोमठाणा गावकऱ्यांनी आंदोलनाचा संपूर्ण खर्च लोकवर्गणीतून उभा केला, या आंदोलनाला बळ दिले. त्यामुळे आधी येथील शेतकरी बांधवांशी  ते संवाद साधणार आहेत.  शेतकऱ्यांशी चर्चा करून याच ठिकाणी पुढील आंदोलनाची दिशा देखील ठरविली जाणार आहे.