बुलडाण्यात परिवर्तनाची लाट? 
जयश्रीताईंच्या गाव भेट दौऱ्यांना अभूतपूर्व प्रतिसाद; जयश्रीताई म्हणाल्या, भय, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला जनता वैतागली....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भय भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला जनता वैतागली आहे. बुलडाण्यात कायद्याचे राज्य नसून "काय घ्यायचे" एवढेच इथल्या लोकप्रतिनिधींना कळते. उद्धव ठाकरे साहेबांशी गद्दारी करून हे खोके घेऊन पळाले त्यामुळे आता इथली जनता त्यांना पळवल्याशिवाय राहणार नाही. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात आता परिवर्तन होणार आणि २३ नोव्हेंबरला मशाल पेटणार म्हणजे पेटणारच असे प्रतिपादन बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी केले. काल,४ नोव्हेंबरला त्यांचा मोताळा तालुक्यातील शिरवा, परडा या गावांमध्ये प्रचार दौरा संपन्न झाला. या दौऱ्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. ही परिवर्तनाची लाट आहे अशी चर्चा यावेळी ऐकायला मिळाली.
यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना जयश्रीताई बोलत होत्या.
 
  पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, तुमची ही लेक तुमचा शब्द खाली जाऊ देणार नाही. विकास तळागाळात पोहोचला पाहिजे. गावखेड्यातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचला पाहिजे यासाठी मी काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
सध्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघात विकासाच्या नावाने केवळ गाजर दाखवण्याचे काम झाले. कधी नव्हे एवढा प्रचंड भ्रष्टाचार गेल्या ५ वर्षांत झाला.सध्याचे हे कमीशनखोरीचे राज्य उलथवून टाकण्याची संधी आपल्याला या निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे. या संधीचे सोने करावे,मला सेवेची संधी द्यावी असेही जयश्रीताई शेळके म्हणाले. यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.