वीजकर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आ. गायकवाड सभागृहात आक्रमक! म्हणाले, वीजकर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या तर शेतकऱ्यांना फायदा...

 

नागपूर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान असलेल्या दुर्लक्षित महावितरण कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय गायकवाड चांगलेच आक्रमक झाले. कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

  महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना अद्यापही कोणत्याही लोकप्रतिनिधींनी हात घातला नाही. विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा शासनापुढे अडचणी मांडल्या. दरम्यान, ही बाब समजल्यानंतर आ. संजय गायकवाड यांनी १९ डिसेंबर रोजी सभागृहात कर्मचाऱ्यांच्या समस्या रेटून धरल्या. लक्षवेधीदरम्यान बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ ते महावितरण कंपनीपर्यंतचा कार्यकाळ पाहता तळागाळामध्ये कार्यरत असणारे सर्व लाइनस्टाफ कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नासंदर्भात शासनस्तरावर अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मानव संसाधन स्तरावर अनेक बैठका झाल्या आहेत. 
  त्यांच्या न्याय्य हक्काच्या मागण्यांसंदर्भात कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे लाइनस्टाफ बचाव कृति समितीने हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन सुरू केले आहे. या कर्मचाऱ्यांसंदर्भामध्ये आतापर्यंत तातडीने निर्णय घेण्यासाठी शासनाने संबंधित मंत्र्यांना कृति समितीच्या मागण्या मान्य कराव्या, असे सांगितले. तसेच हा मुद्दा तातडीने सोडवून शासनाने त्यांना न्याय द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांची वीज खंडित होणार नाही, असे आ. गायकवाड यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.