वरवंडमध्ये साकारतेय ५२२८ मेट्रिक टन क्षमतेचे कोल्डस्टोअरेज! राजर्षी शाहू मल्टिस्टेट व ग्रीन ऍग्रो बाझारचा उपक्रम..
May 18, 2024, 16:14 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राजर्षी शाहू मल्टिस्टेट आणि ग्रीन ऍग्रो बाझार प्रा. लि. च्या माध्यमातून तालुक्यातील वरवंड येथे ५२२८ मेट्रिक टन क्षमतेच्या कोल्ड स्टोअरेज बांधकामास प्रारंभ झाला. परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.
येणारा काळ शेतीचा आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि उपक्रमशील शेतीची कास धरण्याची गरज आहे. फळपीक, भाजीपाला, दुग्ध व्यवसाय यासाठी कोल्ड स्टोअरेज खूप गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक संदीप शेळके यांनी वरवंड येथे कोल्ड स्टोअरेजची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला.
पारंपारिक शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामधून मिळणारे उत्पन्न सुद्धा मर्यादित असल्याने आर्थिकदृष्ट्या ही शेती फायद्याची ठरत नाही. काळाची पाऊले ओळखून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीत बदल केले पाहिजेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी शेतीत नवनवीन उपक्रम राबवतात. त्यामुळे त्यांना जास्त उत्पन्न मिळते. शेती करणे त्यांना परवडते.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भविष्यात आपण अधिकाधिक दर्जेदार सुविधा देणार आहोत. कोल्डस्टोअरेजमुळे शेतमाल अधिक दिवस टिकून राहील. शेतकरी सुखी झाला पाहिजे असा आपला प्रयत्न आहे.-संदीप शेळके, संस्थापक अध्यक्ष राजर्षी शाहू मल्टिस्टेट