"३ टर्म काय त्रास ते तुम्हाला माहीतच हाय! ' त्यांना' काय सगळे जवळचे, घरातलेच लागतात"!! आ.रायमूलकरांच्या व्हायरल  अन ' ' मायनर' संवादाचा रोख कोणावर?  'प्रतापगडा'सह  सेना वर्तुळात खळबळ..!

 
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  एरवी मितभाषी असणाऱ्या आ. संजय रायमूलकर यांचे व्हायरल कॉल रेकॉर्डिंग काही दिवसांपूर्वी भलतेच गाजले . त्याने उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आता त्यांचा दुसरा मोबाईल संवाद तुफानी वेगाने व्हायरल होत असून त्याने ' प्रतापगड 'च नव्हे शिवसेना सह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू असून त्यांच्या आरोपवजा बाणांचा रोख कोणाकडे यावर तर्क वितर्क करण्यात येत आहे.

जवळपास १३ वर्षाच्या आमदारकीच्या काळात आ. रायमूलकर शांत अन संयमी राहिले. मात्र एकनाथ शिंदे यांच्या महाबंड मध्ये सहभागी झाल्यापासून त्यांच्यातील सैनिक चांगलाच जागी झाला असून त्यांनी मनोमनी आता अन्याय सहन करायचा नाही असा निर्धारच केलाय की काय असे चित्र आहे. काय तो डोंगर, काय ते हॉटेल अश्या सारं ओकेच वातावरणात गुवाहाटीत मुक्कामी असताना सिंदखेड राजा मतदारसंघातील एका इरसाल, चिवट सैनिकाने त्यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याला दरडावीत तू खेडेकरांशी बोल, ठेव तो फोन खाली असा सज्जड दम दिला होता. हा संवाद व्हायरल झाल्यावर  व बुलडाणा लाइव्ह ने त्यावर  आधारित बातमी प्रसारित करताच खळबळ उडाली.
 
१५ वर्षातील राजकीय वेदना केल्या शेअर

या पाठोपाठ त्यांचा अलीकडेच गुवाहाटी मध्ये पंचतारांकित मुक्कामी असतानाच व्हायरल झालेला संवाद सध्या प्रतापगडाला हादरे देत सोशल मीडिया व सेना वर्तुळात धुमाकूळ घालत हाय! मतदारसंघातीलच  एका शांत कार्यकर्त्याने या संवादात प्रारंभी त्यांच्या बंडखोरीच्या निर्णयाचे समर्थन करून आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगितले आहे. आता मतदारसंघाचा विकास होईल असे म्हणताच आमदारांनी वरिष्ठ पातळीवरील आपल्या राजकीय वेदना मांडल्या. दीड वर्षे मुख्यमंत्रीची भेट नाही , निधी नाही, मला एवढा मोठा अपघात झाला साधा फोन नाही असे त्यांनी सांगितले.  यानंतर आपण एकत्र राहू असे सांगतानाच त्यांनी गंभीर विषयाला कळत नकळत वाचा फोडली( किंबहुना गौप्यस्फोटच केला असे म्हणता येईल) . ३ टर्म आमदार असताना काय त्रास झाला तुम्हाला माहीतच आहे. यांना काय सर्व जवळचेच लागतात, घरातलेच लागतात अश्या शब्दात त्यांनी वेदना मांडत संवादाचा एन्ड केला.
 
बाण कोणावर?

दरम्यान या संवादाचा एन्ड झाला असला तरी तो व्हायरल झाल्यावर आता या संवादाचा आणि राजकीय परिनामाचा एंड होणार नाही हे नक्की. त्यांच्या आरोपरूपी बाणांचा रोख कोणावर, टार्गेट कोण यावर आता खमंग चर्चा होत आहे. याचा त्यांना मिळू शकणाऱ्या मंत्री पदावर परिणाम होणार काय हा सवाल देखील ऐरणीवर आलाय....मात्र आ. रायमुलकर सायेब एकदम मनातल बोलले, ते बोलले ते एकदम सगळ खरं हाय अशी चर्चा त्यांच्या मतदारसंघात होत आहे..!