डोणगावचा सरपंच होणार कोण?; १४ महिन्यांनंतरही ग्रामस्‍थांना मिळेना उत्तर..!; सौ. सलमाबींच्या विजयामुळे उत्‍सुकता वाढली, स्‍थानिक राजकीय ते आरक्षण लढाईमुळे पेच कायम

 
डोणगाव, ता. मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निवडणूक होऊन १४ महिने झाले तरी डोणगावला अजून सरपंच मिळालेला नाही. त्‍यामुळे विकासकामे रखडली आहेत. नागरिकांची कामे खोळंबली आहेत. खंडपीठाच्या आदेशामुळे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजय गरकल यांनी सौ. सलमाबी सय्यद नूर अतार यांना वॉर्ड क्रमांक १ मधून विजयी घोषित केले आहे. त्‍यामुळे आता शिवसेना समर्थित पॅनलचे ६ तर, काँग्रेस-राष्ट्रवादी समर्थित पॅनलचे ९ सदस्य झाले आहेत. याशिवाय दोन अपक्ष असून, सरपंचपद ओबीसीसाठी राखीव आहे. ओबीसी आरक्षणाच्या तांत्रिक कचाट्यात हे पद सापडते की डोणगावला सरपंच मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्‍थानिक राजकीय लढाई ते आरक्षण लढाई... अशा संकटांचा सामना डोणगाव ग्रामपंचायतीला एकाचवेळी करावा लागत आहे.

काय झाले होते?
वॉर्ड क्रमांक १ मधून सौ. गजालाबी सद्दाम शाह व सौ. सलमाबी सय्यद नूर अतार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र ४ जानेवारी २०२० ला झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत गजालाबींचा अर्ज चुकल्याने रद्द ठरविण्यात आला होता. तो पुरुष गटात पडल्याने वॉर्डात एकच उमेदवार शिल्लक राहून सलमाबीच बिनविरोध निवडून येणार अशी शक्यता निर्माण झाली. मात्र गजालाबींनी नागपूर खंडपीठात दाद मागितल्याने त्‍यांना महिला गटात निवडणूक लढण्याची परवानगी देण्यात आली होती.

त्‍यात १८ जानेवारी २०२१ ला लागलेल्या निवडणूक निकालात त्‍या विजयी झाल्या होत्‍या. सलमाबींनी छाननीवेळी एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याचा मुद्दा धरून नागपूर खंडपीठ ते दिल्ली सर्वोच्‍च न्‍यायालयापर्यंत लढाई लढली. अखेर त्‍या या लढाईत विजयी झाल्या. न्यायालयाच्या आदेशामुळे, जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रानुसार मेहकरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सौ. सलमाबींना विजयी घोषित केले आहे. त्‍यामुळे डोणगावमध्ये आता शिवसेनेचा एक सदस्य कमी झाला आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा एक सदस्य वाढला आहे. त्‍यामुळे सरपंच पदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता वाढली आहे.