'जब- जब मोदी डरता है; ईडी को आगे करता है'! गगनभेदी घोषणा अन थाळी नादाने दुमदुमला जयस्तंभ चौक !! काँग्रेसची बुलडाण्यात जोरदार निदर्शने
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली आज ,१७ जूनला दुपारी एक तास चाललेल्या या थाळी नाद मध्ये काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले. 'सरकार जब भी डरती है ईडी को आगे करती है, या सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, राहुलजी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, भाजप भगाव देश को बचाव, मुकुल वासनिक आगे बढो हम तुम्हारे साथ है ' या गगन भेदी घोषणानी परिसर दणाणला! तालबद्ध थाळी नादाने आंदोलनाची धार तीव्र होऊन रंगतही वाढली. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी श्याम उमाळकर, मीनल आंबेकर, संतोष आंबेकर, विजय सावळे, दीपक रिंढे, राजीव काटीकर, बंडू काळवाघे, अनंत वानखेडे, शैलेश खेडेकर, रवी पाटील, कैलास सुखदाणे, चित्रांगण खंडारे, शैलेश बावस्कर, सुनील पनपालिया, साहेबराव चव्हाण, श्री ढगे, कलिंम खान, अमोल वानखेडे, संतोष पाटील, सुरेश सरकटे, राजू राठोड, शेख चांद, सुरेश इंगळे आदी सहभागी झाले.
संजय राठोड कडाडले!
दरम्यान यावेळी बोलताना युवा नेते संजय राठोड यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली. ईडीचा वापर केवळ विरोधी पक्षाविरुद्ध करणाऱ्या भाजपचे पितळ या सूडबुद्धीने करण्यात येणाऱ्या कारवायांनी उघडे पडले आहे. मात्र यामुळे काँग्रेस पक्ष व पक्ष नेते दबणार नसून या विरोधातील आवाज आणखी बुलंद करणार आहे. येणाऱ्या काळातील प्रत्येक निवडणुकीत भाजपला या पापाची फळे भोगावी लागणार असा जहाल इशाराही राठोड यांनी दिला.