' या सरकारच करायच काय? खाली मुंडके वर पाय' !  केंद्राच्या दडपशाहीविरुद्ध एकवटली जिल्हा काँग्रेस; जिल्हा कचेरीसमोरील महा-धरणे ठरले जंगी शक्तिप्रदर्शन !! 

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्र शासनाची दडपशाही, यंत्रणांचा करण्यात येणारा दुरुपयोग आणि काँग्रेस नेत्यांमागे  लावण्यात आलेला  चौकश्यांचा ससेमिरा या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस समितीतर्फे आज  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महा धरणे देण्यात आले. यानिमित्त जिल्ह्यातील पक्षनेते व कार्यकर्ते एकवटल्याने आज 22 जुलैला आयोजित आंदोलन काँग्रेसचे जंगी शक्तिप्रदर्शन ठरले!...

ईडी ने पक्षनेत्या श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरूद्ध चौकशीचा ससेमिरा लावला आहे. विरोधी पक्ष नेत्याविरोधात ईडी, आयटी, सीबीआय आदी यंत्रणांचा गैरवापर करून दडपशाही चालविली आहे असा आरोप काँग्रेसने केलाय . या विरोधात आणि केंद्राला ' बस करा दडपशाही, देशाला हवी लोकशाही' हे ठणकावून सांगण्यासाठी कांग्रेसने देशव्यापी एल्गार पुकारला. आजचे आंदोलन त्याचाच एक भाग होता.  हाऊसफुल्ल असलेला शामियाना, गगनभेदी घोषणा, नेत्यांची आक्रमक भाषणे, सर्व गट तट विसरून एकवटलेले नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, उत्कृष्ट नियोजन अन आयोजन असा या आंदोलनाचा थाट होता.

जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखालील या ठिय्या मध्ये माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, श्याम उमाळकर, मुखत्यारसिंग राजपूत,  विजय अंभोरे, लक्ष्मण घुमरे, संतोष आंबेकर, विजय सावळे, भाई प्रदीप  अंभोरे,  प्रकाश पाटील, सतीश मेहेंद्रे,  दीपक रिंढे , तुळशीराम नाईक, चित्रांगण खंडारे, महिला नेत्या जयश्री शेळके, मीनल आंबेकर, स्वाती वाकेकर,मंगला पाटील, तबसुम हुसेन, ढोकने ताई यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, विविध सेलचे प्रमुख, कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते.