मेहकरात महाविकास आघाडीची एकजूट! उद्या भाजपच्या विरोधात मेहकर बंद! महापुरुषांचा अवमान करणाऱ्या नेत्यांचा मूक मोर्चा काढून होणार निषेध

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांचा अवमान करण्यात येत असल्याचा आरोप करीत मेहकरात महाविकास आघाडीच्या वतीने उद्या १६ डिसेंबरला मेहकर बंद पुकारण्यात आला आहे. त्यासाठीची बैठक मेहकरात पार पडली, बैठकीला शहर व तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, यांच्यासह काही नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील महापुरुषांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांबद्दल महाराष्ट्रात निषेधाचे सुर  उमटले. या नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानांमुळे देशातील प्रत्येक समाजाच्या भावना दुखावल्या. या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर माफी मागावी आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात कारवाई करावी, यासाठी मेहकर शहरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेऊन १६ डिसेंबर रोजी मेहकर शहरात मुक मोर्चा काढुन बंद पाळण्याची भूमिका घेतली आहे.

  घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये
कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अनंतराव वानखेडे,भिमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस कैलास सुखधाने, कॉंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष देवानंद पवार, माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे,उद्धव ठाकरे यांच्यागटाचे उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, शहरप्रमुख किशोर गारोळे, युवा तालुकाध्यक्ष आकाश घोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरप्रमुख निसार अन्सारी,सागर पाटील, संदीप ढोरे, अनेक महाविकास आघाडी,व समविचारी पक्षाचे आणि राजकीय, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.