राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला! इंधनावरील अत्यल्प दरकपातीवरून आमदार श्वेताताई महालेंची राज्य सरकारवर टीका! म्हणाल्या, ही सामान्य माणसाची थट्टा...!
Updated: May 23, 2022, 10:56 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी कपात केल्यानंतर राज्य सरकारकडून मोठी अपेक्षा होती. मात्र घरात बसून कारभार करणाऱ्या विश्वविक्रमी महाविकास आघाडी सरकारने वरातीमागून घोडे दामटले. राज्यात अल्पदरकपात करत राज्य सरकारने सामान्य माणसाची थट्टा केली आहे अशी घणाघाती टीका चिखलीच्या आमदार श्र्वेताताई महाले यांनी केली आहे.
२१ मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी कपात केली होती. पेट्रोल व डिझेलवरील केंद्रीय कर कमी केल्याने पेट्रोल साडेनऊ रुपयांनी व डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राने दिलासा दिल्यानंतर राज्य सरकारने राज्याचे काम करावे असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. दरम्यान केंद्राने कर कमी केल्यावर दुसऱ्या दिवशी राज्याने राज्याच्या वाट्यातून पेट्रोल २ रुपये ८ पैसे व डिझेल १ रुपया ४४ पैशांनी कमी केले.
दरम्यान हा प्रकार म्हणजे वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रकार आहे. राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला असा हा प्रकार असल्याचे आमदार श्र्वेताताई म्हणाल्या. आघाडी सरकारने सामान्य माणसाची थट्टा चालवली असल्याचे त्या म्हणाल्या.