गुंगी आलेल्या सरकारला बुस्टर डोस ची गरज! आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा बुलडाण्यात घणाघात! म्हणाले, सरकारची मती गुंग! सत्तेच्या जोरावर कुठल्याच आमदाराने दादागिरी करू नये..!
बुलडाणा जिल्ह्यातील बऱ्याच गावांत अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे कुठलेही निकष न लावता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज असून हेक्टरी ५० हजार रुपये मदत दहा दिवसांच्या आत सरकारने उपलब्ध करून द्यावी असेही आ.डॉ.शिंगणे यावेळी म्हणाले.
या सरकारमध्ये चाललय काय..
या सरकारमध्ये चाललय काय हे कळायला मार्ग नाही. कुठल्याही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. शिंदे फडणवीस सरकार राज्यात आल्यापासून प्रत्येक कामावर स्थगिती आणल्याने विकास थांबला आहे. हे सगळ हेतुपुरस्सर सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार येत जात असते मात्र अशा प्रकारे विकास कामांवर स्थगिती आणण्याचे काम कोणत्याही सरकारने केले नाही. आज तुम्ही सत्तेत आहात पण एक गोष्ट लक्षात ठेवा उद्या आम्ही पुन्हा सत्तेत येणार आहोत असा इशाराही डॉ. शिंगणे यांनी दिला.
जिल्ह्यातील विकास कामे खोळंबली...
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपल्या बुलडाणा जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून जिल्ह्यातील विकास कामे थंडावली असल्याचे आ.डॉ. शिंगणे यावेळी म्हणाले. सत्तेच्या जोरावर कुठल्याच आमदाराने दादागिरी करता कामा नये , सत्ता ही कुणाच्याही सातबाऱ्यावर नसते नसते हे देखील लक्षात घ्यायला हवं असा टोला त्यांनी सत्ताधारी पक्षातील दादागिरी करणाऱ्या आमदारांना लगावला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड नाझेर काझी ,मनोज दांडगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.