बुलडाण्यातल्या शिवसैनिकांची अवस्था म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे! शिवसैनिकांनी पालकमंत्री डॉ.शिंगणे विरुद्ध केलेल्या आरोपांवर  राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांचे प्रत्युत्तर! 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील सत्ता अस्थिर असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सत्ता वाचविण्यासाठी शिवसेनेसोबत असताना बुलडाण्यात मात्र शिवसेना राष्ट्रवादी आमने सामने आल्याचे चित्र आज, २५ जून रोजी पहायला मिळाले.(अर्थात हे चित्र गेल्या अडीच वर्षांपासून होते हा शिवसैनिकांचा दावा आहे.) दुपारी शिवसेना शहरप्रमुख आणि आ.संजय गायकवाड यांचे खंदे समर्थक गजानन दांदडे यांनी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याविरुद्ध आगपाखड केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने यांनी या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बुलडाण्यातील शिवसैनिकांची अवस्था म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली असल्याचा हल्लबोल त्यांनी केला.

 आ. संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या गटात आधीपासून सहभागी झाले आहेत. आज दुपारी त्यांनी कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यानंतर शिवसैनिकांनी जयस्थंभ चौकात एकत्र येत आ. गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. व आघाडी तोडा अशी विनंती उद्धव ठाकरे यांना केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना शहरप्रमुखांनी राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करीत असल्याचा आरोप केला. पालकमंत्री डॉ.शिंगणे निधी देण्यात दूजाभाव करतात असेही ते म्हणाले. 

या आरोपांना दत्तात्रय लहाने यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यांनाच शिवसेनेत राहायचे नाही त्यामुळे हे बिनबुडाचे आरोप करीत आहेत. सर्वात जास्त निधी हा बुलडाणा विधानसभा मतदार संघालाच मिळाला आहे. मात्र तिकडे जायचे असल्याने पालकमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करायचे असा हा खटाटोप आहे . हे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी शिवसैनिकांची अवस्था झाल्याचे दत्तात्रय लहाने म्हणाले. आ. संजय गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी असेही ते म्हणाले.