दिशा बचतगट फेडरेशनच्या रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद! १९० युवकांना जागेवरच नियुक्तीपत्रे! जयश्रीताई शेळके म्हणाल्या,तरुणांच्या हाताला काम हेच आमचे उद्दिष्ट!
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मागील काही वर्षांमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र बेरोजगारीवर केवळ वारंवार बोलून तो प्रश्न संपणार नाही. तर यासंदर्भात ठोस पावले उचलावे लागतील. आजच्या रोजगार मेळाव्यातून आपण बेरोजगारी संपवण्याच्यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. येणाऱ्या काळात तरुणांच्या हाताला काम देणे हेच आमचे उद्दिष्ट, असे प्रतिपादन दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके यांनी केले.
दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्यावतीने स्थानिक जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथे आज ११ डिसेंबर रोजी आयोजित रोजगार मेळाव्यात त्या बोलत होत्या. मंचावर राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, अभिता कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सुनील शेळके, राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना जयश्रीताई शेळके म्हणाल्या, ग्रामीण भागातील युवकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. मात्र त्यांना योग्य संधी मिळत नाही. अनेकदा ग्रामीण भागातील युवक मोठ्या कंपन्यांपर्यंत पोहचू शकत नाही. तर दुसरीकडे मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये काम करण्याचे कौशल्य ग्रामीण युवकांमध्ये नाही, असे कंपनीच्या प्रशासनास वाटते. आजच्या रोजगार मेळाव्याने हे दोन्ही गैरसमज दूर करण्याचे काम केले आहे. मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नामांकित २४ कंपन्यांचे प्रतिनिधी येथे उपस्थित आहेत. पुढील वर्षभरात दिशा फेडरेशनच्या माध्यमातून २० हजार रोजगार उपलब्ध करण्यात येणार आहेत. मुलाखतीत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे त्यांनी कौतुक केले. अभिता कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सुनील शेळके म्हणाले की, युवकांनी केवळ शासकीय नोकरीच्या मागे धावू नये. खासगी क्षेत्रात सुद्धा मोठ्या संधी आहेत. युवकांनी त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्यात मोठे उद्योग नाहीत. पर्यायाने रोजगाराच्या संधी कमी आहेत. युवकांच्या हाताला काम मिळाले पाहिजेत. त्यादृष्टीने दिशा बचतगट फेडरेशनच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याच्या रुपाने सकारात्मक सुरुवात झाली असल्याचे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले. संचालन शैलेशकुमार काकडे यांनी तर आभार ऋषीकेश म्हस्के यांनी मानले.
१९० युवकांना जागेवरच नियुक्तीपत्र
रोजगार मेळाव्याला सकाळी १० वाजेपासून सुरुवात झाली. दिवसभरात १२५० युवकांनी मेळाव्याला हजेरी लावली. उपस्थित युवकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीत यशस्वी झालेल्या १९० युवकांना जागेवरच नियुक्तीपत्रे देण्यात आली. मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
२४ नामांकित कंपन्यांचा सहभाग
दिशा बचतगट फेडरेशनच्या रोजगार मेळाव्यासाठी राज्य आणि राष्ट्रीय २४ नामांकित कंपन्या सहभागी झाल्या. यामध्ये व्हिजिएम असोसिएट, अनुप्रीत कॅपिटल, एअर फिंटेक प्रा. लि. , रिच वर्य प्रा. लि. , पीपल ट्री ऑनलाइन, अभिता लॅन्ड सोल्युशन प्रा. लि. , लेगावेक रिसोर्सेस यासह नामांकित २४ कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.