काही जण आयुष्यभर नावामागे "माजी' लावण्यासाठी पदे घेतात!; खासदार जाधव यांच्या शिवसैनिकांना कानपिचक्‍या!!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिवसैनिकांनी बेरजेचे राजकारण केले पाहिजे. काही जण फक्त आयुष्यभर नावामागे माजी तालुकाप्रमुख, माजी जिल्हाप्रमुख असे लावण्यासाठी पदे घेतात. निवडून आलेल्या डोक्यांवर पक्षाची ताकद मोजली जात असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मोठ्या संख्येने उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.

आमदार संजय गायकवाड यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता - मित्र - परिवार संवाद कार्यक्रमात आज, १६ फेब्रुवारीला खासदार प्रतापराव जाधव यांनी समारोपाचे भाषण केले. मात्र त्यांच्याआधी झालेले आमदार संजय गायकवाड यांचे भाषण सुपरहिट तर खासदार जाधव यांचे भाषण सुपरफ्लॉप झाल्याची चर्चा कार्यक्रमानंतर उपस्थितांमध्ये सुरू होती.

आमदार गायकवाड यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमानंतर स्‍नेहभोजनसुद्धा ठेवले होते. मुळात कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाला. त्यामुळे खासदार जाधव यांनी भाषण सुरू केले तेव्हा अनेक जण भाषण संपण्याची वाट पाहत होते. आपल्या दीर्घ भाषणात शिवसैनिकांना कानपिचक्‍या देत भाजपवाले कसे योग्य राजकारण करतात आणि आपण कसे त्‍यांच्या मार्गावर जायला पाहिजेत, हे खा. जाधव यांनी पटवून दिले. ते म्‍हणाले, की शिवसैनिकांनी सामान्य लोकांना मोठे केले. मी साधा शेतकरी होतो. मेहकरमध्ये आडतचे काम करत होतो. दुसऱ्या एखाद्या पक्षात असतो तर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्य इथपर्यंत मजल मारता आली असती. मात्र शिवसेनेने खासदार केले, असे खा. जाधव म्‍हणाले.

आता शिवसैनिकांनी बेरजेचे राजकारण केले पाहिजे. वजाबाकी कराल तर झिरो व्हाल, असा सल्ला त्यांनी दिला. भाजप बेरजेचे राजकारण करत आहे. अनेक पक्षांतील लोक भाजपात आले. भाजपने त्यांना पदे दिली. तिकिटे दिली. मात्र भाजपवाले ओरडले नाहीत. पक्षाने दिलेला उमेदवार भाजपने निवडून आणला असे म्हणत खासदारांनी भाजपचे गुण घ्या, असा अप्रत्यक्ष सल्ला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिला. अनेक कार्यकर्ते पदे मागण्यासाठी येतात. मात्र पदे घेतात अन् कामच करत नाहीत. काही जण फक्त आयुष्यभर नावामागे माजी तालुकाप्रमुख, माजी जिल्हाप्रमुख असे लावण्यासाठी पदे घेतात, असे खासदार जाधव म्हणाले.

आमच्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखाला त्याचे काय काम असते हेच कळत नाही. गावातील लोक विचारत नाहीत, मित्रपक्षांचे लोक विचारत नाहीत, अशी त्यांची तक्रार असते. त्यांच्यामागे १०० तरुणांची फौज असेल तर मित्रपक्षच काय तर विरोधकही विचारतील, असे खासदार जाधव म्हणाले. खासदार जाधव यांच्या या विधानावरून जिल्ह्यात शिवसेनेची स्थिती काय आहे, हेच त्यांनी कबूल केल्याचे दिसून आले. पुढचा काळ संघर्षाचा आहे. मुख्य लढाई भाजपसोबत आहे. येणाऱ्या काळात निवडणुकीच्या तिकिट वाटपात आमच्याकडून चुकाही होऊ शकतात. मात्र जरा शांतता आणि संयम ठेवा. बुलडाणा नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात घ्या. शिवसेना आता राजकीय पक्ष आहे. निवडून आलेल्या डोक्यांवर पक्षाची ताकद मोजली जात असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मोठ्या संख्येने उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला खा. जाधव यांनी देऊन लांबलेले भाषण संपवले.

संबंधित बातमी ः 

प्लॉट विकून शेती घेतली... संपत्ती माझ्या वडिलांची!; आमदार संजय गायकवाड यांचा खुलासा; म्हणाले, मला वेळोवेळी जीवे मारण्याच्या धमक्या!! नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीशी युतीचे संकेत, पण काँग्रेसला ठेवणार दूर