सिंदखेडाजात काँग्रेसचे जेलभरो! केंद्र सरकारवर सडकून टीका! आंदोलनकर्ते म्हणाले, सामान्यांचे जगणे मुश्कील झाले!

 
सिंदखेडराजा( बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत काँग्रेसच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. वाढती महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूवरील वाढवलेल्या जीएसटी आणि अग्निपथ योजनेच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकर्त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, भाजीपाला यांचे वाढलेले दर आणि त्यातच जीवनावश्यक वस्तूवर वाढलेली जीएसटी यामुळे सर्वसामान्य जनतेची जगणे कठीण झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

केंद्र सरकारने देशातील युवकांच्या भविष्याचा कुठलाही विचार न करता हुकूमशाही पद्धतीने आणि घाईघाईत अग्निपथ योजना ही युवकांचे भविष्य धोक्यात घालणारी योजना लागू केली आहे. न्याय व्यवस्था, ई.डी. यांचा दुरुपयोग सरकारने चालवला आहे असा आरोपही करण्यात आला.  याचाच  निषेध म्हणून सिंदखेड राजा  येथे सिद्धार्थ जाधव यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

यावेळी दिपक ठाकरे, उल्हास भुसारे, प्रल्हाद वाघमारे, मदन आघाव,अतिश राठोड,राजू पाखरे, शेख कदिर शेख नजिर, कैलास मांटे,कडूबा पाखरे, गणेश भाग्यवंत, नामदेव राठोड(मंत्री),बाबुराव राठोड, संजय शेवाळे, ज्ञानेश्वर राठोड,राजू धोंगडे उपस्थित होते.