सांगण्यासारखं काही नसल्याने ते उगाच माझ्या नावाने बोंबा मारत आहेत! डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतला बंडखोरांचा समाचार! सातगाव म्हसला येथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा दणक्यात! 

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जे बंडखोर तिकडे गेलेत आता त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही कारण नाही..जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. आता उगाचच ते माझ्या नावाने बोंबा मारत आहेत अशा शब्दात माजी मंत्री तथा आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी बंडखोरांचा समाचार घेतला. बुलडाणा तालुक्यातील सातगाव म्हसला येथे मासरुळ जिल्हा परिषद सर्कल मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी पार पडला यावेळी ते बोलत होते.

आतापर्यंतच्या निवडणुकांत धाड परिसरात मला जशी साथ मिळाली त्याच प्रमाणे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ द्यावी. धाड आणि मासरुळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये कोणत्याही परिस्थीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकलाच पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. राज्यातील जनतेने आपले काम बघितले असल्याने जनता आपल्यासोबतच आहे. बंडखोर मंडळीकडे सांगण्यासारख काही नसल्याने ते पालकमंत्र्यांचा त्रास होत होता असे सांगत माझ्या नावाने बोंबा मारत आहेत.

मात्र जनतेला त्यांचे कारनामे चांगलेच माहीत आहेत अशा शब्दात विरोधकांचा त्यांनी समाचार घेतला. खोके आणि इडीमुळेच जायचे होते तर धुतल्या तांदळासारखे असल्याचा आव कशाला आणता असा सवालही यावेळी डॉ . राजेंद्र शिंगणे यांनी केला. भविष्यात जनता त्यांना त्यांची जागा दाखवुन दिल्याशिवाय राहणार नाही.

कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरे जाण्यासाठी तयारीला लागावे  अशा सूचना यावेळी उपस्थितांना डॉ. शिंगणे यांनी दिल्या. यावेळी रामदास भोंडे, मनोज दांडगे, नरेश शेळके, दत्तात्रय लहाने, पांडुरंग तायडे, निलेश देठे, शिवाजीराव पालकर, तय्यब खासाब, सरपंच राधाताई देठे, सांडू सिंग राजपूत, प्रदीप अण्णा घुसळकर, डॉ.देठे, राजू नरोटे, विठ्ठल सिंग मोरे , धाडच्या सरपंच सौ. बोर्डे व मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.