इफ्तार पार्टीत शिवसेना आमदार संजय गायकवाड सहभागी! मशिदीवरील भोंग्यांबद्दल म्हणाले....
 

 
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेले बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काल, २० एप्रिलला सायंकाळी बुलडाणा शहरातील जामा मशिदीत इफ्तार पार्टीत हजेरी लावली. मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. बुलडाणा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. इफ्तार पार्टीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार गायकवाड यांनी भाजप व मनसेवर हल्ला चढवला.
राज्यातील सगळे प्रश्न बाजूला ठेवून सध्या मशीदीवरील भोंगे काढा ,हनुमान चालीसा वाचा अशा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी विरोधी पक्षांकडून होत आहेत. राज्यात धार्मिक तेढ निर्माण करायचे.  दंगली घडवायच्या सरकार पाडायचे, राष्ट्रपती राजवट लागू करायची आणि पुन्हा भाजपच सरकार स्थापन करायचे असे मनसुबे भाजपचे आहेत. त्यांनी दोन समाजात कितीही आग लावायचा प्रयत्न केला तरी तरी दोन्ही समाजाकडून आता शांतता आणि संयम ठेवल्या जाणार आहे. भाजपच्या मनसुब्यांना आता यश मिळणार नाही असे संजय गायकवाड म्हणाले.