जिल्ह्यातील शिवसैनिक कन्फ्युज! जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीवर होणार परिणाम! लढायचे कुणाविरोधात अन्  कुणाला घ्यायचे सोबत? सारा गोंधळ..आता  तर शशिकांत खेडेकरही शिंदेगटात..!

 
बुलडाणा( कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील सत्तानाट्याचा ३० जून रोजी अनपेक्षित अन् धक्कादायक समारोप झाला . देवेंद्र फडणवीसांनी धक्कातंत्र वापरून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील अशी घोषणा केली. पक्षाच्या आदेशाने स्वतः उपमुख्यमंत्रीपद स्विकारले. संपूर्ण मीडियासाठी, विरोधी पक्षातल्या नेत्यांसाठी, उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा हा मोठा धक्का होता. यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे खुद्द उद्धव ठाकरे यांनाही लवकर कळाले नाही अन् शपथविधीचे निमंत्रण असताना सुद्धा ते शिवसैनिकाच्या शपथविधीला हजर राहिले नाही. उठसूठ पत्रकारांना बातम्या पुरवण्यात माहीर असलेले अन् प्रत्येक घडामोडींवर ट्विट करणारे शिवसेना(?) प्रवक्ते संजय राऊत यांनीसुद्धा त्या रात्री कुठलेही ट्विट केले नाही अन् प्रतिक्रिया सुद्धा दिली नाही. जिथे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची ही अवस्था असेल तिथे सामान्य शिवसैनिकांचे काय? त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसैनिक सुद्धा कन्फ्युज असल्याचे चित्र आहे.

एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीस  दोघेही हे शिवसेना भाजपा युतीचे सरकार असल्याचे सांगत आहेत. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत.  नव्या विधासभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना गटनेते म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे पेच आणखी वाढणार आहे..दररोज एक एक आमदार, माजी आमदार, माजी खासदार यांच्याकडून एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत.  सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीत असताना जिल्ह्यात शिवसैनिकानी "निम का पत्ता कडवा" या थरापर्यंत येऊन घोषणाबाजी केली होती. जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, नरेंद्र खेडेकर यात आघाडीवर होते. या सगळ्या खटाटोपात माजी आमदार शशिकांत खेडेकर मात्र कुठे दिसले नव्हते.

आता त्यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ते शिंदेसोबत असल्याची फक्त  औपचारिक घोषणा व्हायची बाकी आहे..ती नाही झाली तरी त्यांच्या समर्थकांना खरे काय ते माहीत आहे. संजय गायकवाड , संजय रायमुलकर दोघे शिलेदार आधीपासूनच शिंदे गटात आहे. खासदार जाधव यांची मनातून प्रचंड इच्छा असली तरी अजूनही त्यांची भूमिका तळ्यात मळ्यात आहे. जिथे नेतेच संभ्रमात तिथे बिचाऱ्या कार्यकर्त्यांनी  तरी काय करावे? त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आता कोणता झेंडा हाती घ्यायचा यावरून शिवसैनिक कन्फ्युज आहेत..!

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कशा..?

नवे सरकार स्थापन झाल्यानंतर निवडणुकीसंदर्भात काही धोरणात्मक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे थेट जनतेतून सरपंच अन् थेट जनतेतून नगराध्यक्ष ही पद्धत पुन्हा लागू करण्यावर शिंदे - फडणवीस सरकार काम करू शकते. त्यामुळे आता नगरपालिका निवडणुकीची तयारी करणारे सर्वपक्षीय नेतेही "कन्फ्युज" आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही..त्यावेळी ठाकरे गटातील शिवसैनिकांची भूमिका काय असेल? ठाकरे गट राष्ट्रवादी अन् काँगेससोबत घरोबा कायम ठेवेल का? तसे झाले तर ज्या संभाव्य उमेदवारांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी केली आहे त्यांचे काय?  असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत..अर्थात या सगळ्या प्रश्नांची नेमकी उत्तरे सध्या कुणालाही देता येणार नाही. त्यामुळे ही उत्तरे मिळविण्यासाठी येणाऱ्या काळाची वाट पाहणे एवढेच आपल्या हातात आहे.