शिंगणे साहेब.... तुम्हाला "निष्ठा" जपणे कसे जमते हो? सांगा जरा बाकीच्यांना..! एवढ्या वर्षांपासून तुम्ही एकाच पक्षात कसे..?

 
बुलडाणा( कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिवस उजाडला की तसा अंधार ठरलेलाच असतो. वादळे येतात जातात, सुख दुःख हे प्रत्येकाच्या जीवनात असतेच. पण अशावेळी जपायची असते ती निष्ठा आणि प्रामाणिकपणा! राजकारणात कधी हा पक्ष सत्तेत असतो तर कधी दुसरा. काही पक्षांना सत्ता मिळविण्यासाठी बरीच वाट पहावी लागते, अशा वेळी त्या पक्षातील किती नेते आणि कार्यकर्ते टिकून राहतात यावरून त्यांची निष्ठा ठरत असते. आता  सध्याच्या घडीला जिल्ह्यातील काही मातब्बर नेतेमंडळी स्वतःची मोठी ताकद असताना दुसऱ्या गटात सामील होत आपले व आपल्या मुलाबाळांचे राजकीय बस्तान सुरक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काहींना तर "ईडी" ची  भीती असल्याची चर्चा आहे तर   काहींच्या मनात पक्षातील वरिष्ठ दुर्लक्षित करीत असल्याची खंत आहे.  खरे तर अडचणीच्या काळात पक्षाला "बाय बाय" करणाऱ्यांनी माजी मंत्री  डॉ. राजेंद्र शिंगणे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. जिल्ह्यातील तत्कालीन जनसंघाचे नेते (नव्हे कार्यकर्ते) स्व. केशवराव बाहेकर, स्व.भाऊसाहेब फुंडकर, चिखलीचे माजी आमदार बाबुराव  पाटील, मलकापूरचे माजी आमदार स्व. अर्जुनराव वानखेडे अशा मोजक्या मंडळींची नावे सुद्धा "निष्ठावान" या गटात मोडतात हे विशेष..!

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सिंदखेडराजा विधानसभेचे आमदार डॉ. राजेंद्रजी शिंगणे हे पक्षनिष्ठेच्या बाबतीत जिल्ह्यातील वर्तमानातील राजकीय नेत्यांच्या बाबतीत उजवेच ठरतात. १९९५ ला सिंदखेडराजा विधानसभेतून अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर साहेबांनी कधी मागे वळून बघितलेच नाही. त्यानंतरच विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढले अन् जिंकलेदेखील..

तेव्हापासूनचा हा सिलसिला आजतागायत सुरू आहे..विधानसभा निवडणुकीत साहेबांनी अर्ज भरला म्हणजे विजयाचा गुलाल साहेबांचाच हे समीकरण आता पक्के झालेय. अर्थात यासाठी साहेबांनी प्रचंड मेहनत घेतली, हजारोंच्या संख्येने माणसे जोडली, प्रामाणिक कार्यकर्ते जमवले आणि त्यांना फेविकॉलसारखे पक्के जोडून ठेवले. जात, पात, धर्म,पंथ याआधारे भेदभाव न करता लहानसहान कार्यकर्त्यांना मोठे केले. त्यामुळे तब्बल ५ वर्षे आमदार नसतांना सुद्धा  साहेबांना कुणी सोडून गेले नाही. अर्थात जिथे स्वतः साहेबच निष्ठावान म्हटल्यावर कार्यकर्तेही तसेच असणार ना..!
   
निष्ठा म्हणजे साहेब..!
 
  प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केल्यानंतर कर्माचे फळ मिळतेच.."साहेब" त्याला अपवाद नाहीत. वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर ज्या पद्धतीने साहेबांनी कामाचा आवाका वाढवला त्याला तोड नाही. ५ वेळा आमदार, राज्यातील महत्वाचे खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद, पालकमंत्रीपद असा मोठा पल्ला त्यांनी गाठलाय. त्यातही विशेष कमाई म्हणून शरद पवारांचा त्यांच्यावर असलेला प्रचंड विश्वास अन् शिंगणे साहेबांची पक्षाप्रती असलेली निष्ठा याकडे पाहिल्या जाईल. ज्या पक्षाने, ज्या नेत्याने आपल्याला ओळख दिली, सर्वकाही दिले त्या पक्षाप्रती निष्ठा असावी ती शिंगणे साहेबांसारखीच. त्यामुळे  आजच्या राजकारणात क्षणाक्षणाला तत्व, विचार, निष्ठा ही मूल्ये पायदळी तुडवली जात असताना शिंगणे साहेब तुम्हाला "निष्ठा" जपणे कसे जमते हो..?  तेवढे सांगा जरा बाकीच्यांना...!