देऊळगाव राजा तालुक्यात शिंदे गटाचा फ्लॉप शो! शशिकांत खेडेकरांच्या मागे उरलय तरी कोण? संपर्क अभियानाचा पचका
काल, २६ सप्टेंबर पासून शिंदेगटाच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली. देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस बु येथून सुरू झालेल्या या अभियानाचा कार्यकर्त्यांनअभावी पचका होत असल्याचे चित्र आहे. देऊळगाव राजा तालुक्याचे शिवसेना ( ठाकरे गट) तालुका प्रमुख दादाराव खार्डे यांनी शशिकांत खेडेकर यांच्यासोबत जायला नकार दिल्याने शिंदे गटाचा तालुका प्रमुख नियुक्त करतांना खेडेकरांवर चांगलीच नामुष्की ओढवली.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीतून डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्वतःहून माघार घेतल्यामुळे खेडेकरांचे नशीब उजळले होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांची एंट्री झाल्यानंतर खेडेकरांचा पराभव झाला. २०१४ ला स्वतंत्रपणे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवताना खेडेकरांनी ६४ हजार २०३ मते घेतली होती. मात्र २०१९ ला भाजपा सोबत असताना सुद्धा खेडेकरांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. यावरून ५ वर्षांच्या आमदारकीच्या काळात खेडेकरांना फारसे संघटन जमले नसल्याचेच दिसून येते. खेडेकर शिंदेगटात गेल्यानंतर तर आता त्यांचे पितळ चांगलेच उघडे पडले. त्याचा प्रत्यय आता शिंदेगटाच्या फ्लॉप होत असलेल्या शिवसंपर्क अभियानात दिसून येत आहे. त्यामुळे आता खेडेकरांच्या मागे उरलय तरी कोण असा प्रश्न अनेकांच्या तोंडावर आहे.