नव्या अंचरवाडी पंचायत समिती सर्कलवर यंदा भगवा फडकवायचाच! शिवसैनिक म्हणतात, आमचं ठरलंय! शिवा चव्हाण आमचे उमेदवार..!

 
चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने कोणत्याही क्षणी निवडणुका घोषित होऊ शकतात. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात निवडणुकीची जोरदार पूर्वतयारी करण्यात येत आहे. नव्या प्रभाग रचनांवर हरकती प्राप्त झाल्या असल्या तरी त्यामुळे सध्या जाहीर झालेल्या प्रभागरचनेवर फारसा फरक पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे जाहीर झालेली प्रभाग रचना गृहीत धरून इच्छुक उमेदवारांनी आपापली तयारी सुरू केली आहे. नव्याने जाहीर झालेल्या अंचरवाडी जिल्हा परिषद गटातील अंचरवाडी पंचायत समिती गणाची निवडणूक यंदा चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. प्रत्येक पक्षाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान शिवसेनेकडून अंचरवाडी येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख शिवा चव्हाण यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी धरला आहे. खुद्द शिवा चव्हाण यांनीसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली असल्याने आता उमेदवारी जाहीर होण्याची वाट न पाहता प्रत्यक्ष तयारीला सुरुवात केली आहे.

शिवा चव्हाण हे अंचरवाडी चे माजी उपसरपंच व कट्टर शिवसैनिक स्वर्गीय दामोधर चव्हाण उर्फ दामूशेट्टी चव्हाण यांचे चिरंजीव आहेत. याआधी शेट्टी यांनीही पंचायत समितीची निवडणूक लढवली होती मात्र त्यावेळी अवघ्या १३ मतांनी त्यांची विजयश्री हुकली होती. मात्र पराभव होऊनही दामू शेट्टी हे समाजकारणात सक्रिय होते. उपसरपंच असताना देखील गावाच्या विकासात त्यांच्या सक्रिय सहभाग होता. शेट्टींच्या निधनानंतर त्यांचा समाजकारणाचा वारसा त्यांचे चिरंजीव शिवा चव्हाण समर्थपणे सांभाळत आहेत.

शिवसेनेच्या संघटनेच्या माध्यमातून तरुणांची मोठी फळी त्यांनी उभी केली आहे. केवळ अंचरवाडी गावातच नव्हे पंचक्रोशीत एक कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन शिवा चव्हाण यांची ओळख आहे. खासदार प्रतापराव जाधव आणि माजी आमदार शशिकांत खेडेकर यांचे कट्टर समर्थक असलेले शिवा चव्हाण जनतेच्या सुखदुःखात मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. 

पंचायत समितीच्या सभागृहात जाऊन सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. सरकारच्या अनेक योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबविल्या जातात मात्र अधिकारी आणि नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे खऱ्या गरजू आणि गरीब लोकांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे सगळ्या योजना श्रीमंताच्या घशात जात असल्याचे शिवा चव्हाण सांगतात.

खऱ्या गरजू आणि तळागाळातील सर्वसामान्य लोकांना विकासाच्या योजना मिळवून देण्यासाठी पंचायत समितीची निवडणूक लढायची असल्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. निवडणुका लढण्यासाठी पैसा नसला म्हणून काय झाले जनतेसाठी निधड्या छातीने लढण्याची हिम्मत असल्यावर कशाला हवेत पैसे असा सवालही शिवा चव्हाण यांनी केला..जनतेचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे, पक्षाचाही विश्वास आपल्यावर आहे त्यामुळे पंचायत समिती निवडणुकीत  विजयश्री मिळवणारच असा दावा शिवा चव्हाण आणि त्यांचे समर्थक करीत आहेत.