SUNDAY SPECIAL दोन महिन्यांपूर्वी ' २४ विरांचा' जन्म झाला,  नामकरण केले पण... नाव गुलदस्यातच ठेवले!!

 
बुलडाणा ( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बातमीचे हेडिंग वाचून  वाचक अन व्हिव्युर्स चक्रावून जाणे अन बुचकळ्यात पडणे स्वाभाविकच आहे! पण हे वीर कुणी सजीव नसून नजीकच्या काळात दिग्गज सजीवांना नाचविणारे अन  भावी  राजकीय रणसंग्रामाशी निगडित घटक आहे.  जास्त ताणले तर तुटते हा नियम आहे. त्यामुळे जास्त ताणत न बसता  स्पष्टच करायचे झाल्यास हे वीर   जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे नवीन गट आणि गण आहे. 

 मागील मार्च महिन्यात बुलडाणा जिल्हापरिषदेच्या गट आणि १३ पंचायत समित्यांच्या गणांची प्रारूप रचना करण्यात आली.  जिल्हापरिषदेचे ८ गट आणि पंचायत समित्यांचे  १६ गण वाढले आहे.  याला जवळपास २ महिने उलटले आहे. २ महिन्यांपूर्वी जन्मास आलेल्या या २४ मतदारसंघाचे तात्काळ नामकरण देखील करण्यात आले. मात्र याचे नामकरण करतांना काटेकोर गुप्तता  पाळण्यात आली. अगदी मोजक्या' 'सोयऱ्यांच्या' हजेरीने त्यांची नावे ठेवण्यात आली.   बारसे तर सोडा आजपर्यत देखील  त्यांची नावे गुप्तच ठेवण्यात आली आहे. मजेदार म्हणजे त्यांची नावे मे महिन्यात पण  गुलदस्यातच राहणार हाय! प्रभाग रचनेला आयुक्तांची मान्यता मिळाल्यावर जिल्हाधिकारी २ जूनला प्रारूप प्रभाग रचनाची प्रसिद्धी करतील तेंव्हाच या २४ जणांचे नाव उघड होणार आहे.

 ७ तालुक्यांचे विर

 दरम्यान मेहकर मध्ये २ तर चिखली मध्ये १ गट वाढला असून अनुक्रमे ८ व ७ गट राहणार आहे. अर्थात गण १४ राहणार आहे. बुलडाणा( ७ गट) , खामगाव( ८गट) , मलकापूर(४) , मोताळा(५) ,नांदुरा (५) या तालुक्यात प्रत्येकी २ गट व २ गण वाढले आहे.