जिल्ह्यातील ७ पालिकांच्या प्रभाग रचनांचा 'निकाल'  सोमवारी !  मलकापूरची रचना वादळी ठरण्याची चिन्हे !! 

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील ७ पालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा 'निकाल' मंगळवारी लागणार असून मलकापुरसह काही ठिकाणच्या रचना वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने  त्यावरील  जिल्हाधिकाऱयांचा   निर्णय   लक्षवेधी ठरला आहे. 

जिल्ह्यातील ७ नगरपरिषदांच्या प्रारूप प्रभाग रचनावर  घेण्यात आलेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांच्या समक्ष २३ मे रोजी सुनावणी घेण्यात आली.  रचनेवर हरकत घेणारे राजकीय कार्यकर्ते, माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी त्यांची  तर पालिकांच्यावतीने मुख्याधिकारी व  स्थापत्य अभियंता यांनी बाजू मांडली.  यावेळी मलकापूर सह शेगाव मधील माजी- भावी नागरसेवकांचा संतप्त अवतार दिसून आला. मलकापूर मधील रचना सुनावणी मध्येही वादळी ठरली. एवढेच काय तेथील सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मनमानी वर टीकास्त्र सोडले. या पार्श्वभूमीवर ३० मे रोजी जिल्हाधिकारी आपला निर्णय देणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी चिखली वगळून अन्य ८ पालिकांच्या प्रभाग रचनावर मागील १०ते १४ मे दरम्यान नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या . बुलडाणा,  मलकापूर मध्ये सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी ११ ( एकूण २२) हरकती प्राप्त झाल्या. मेहकर, देऊळगाव राजा व खामगाव मध्ये प्रत्येकी ४ मिळून १२, शेगाव मध्ये ५ तर जळगाव जामोद मध्ये केवळ एकच हरकत प्राप्त झाली.  नांदुरा मध्ये एकही हरकत प्राप्त झाली नाहीये!.