जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी ६० हजार लिटर ऑईल उपलब्ध करून द्या! रविकांत तुपकारांची मुंबईच्या महावितरण मुख्य अभियंत्याकडे मागणी; जिल्ह्यात रब्बीच्या तोंडावर ओलीतीची कामे विस्कटली

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): परतीच्या पावसाने हातचा घास हिरावल्यानंतर शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. जिल्ह्यात जलसाठे तुडुंब भरलेले आहे.या  हंगामात सिंचनासाठी वीजेची आवश्यकता असते. मात्र ऐन रब्बी हंगामातच  विद्युत रोहित्र वारंवार जळतात आणि  त्याच्या दुरुस्तीसाठी महिना – महिना वाट पहावी लागते. रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले ऑईल उपलब्ध नसल्याचे नेहमी  महावितरणकडून सांगितले जाते. ही अडचण दूर होणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील  विद्युत रोहित्र दुरुस्तीसाठी जिल्ह्यात तातडीने साठ हजार लिटर ऑईल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी महावितरणचे साहित्य व्यवस्थापन विभाग मुंबईचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे. 

मुख्य अभियंता, प्रकाशगड मुंबई यांना दिलेल्या निवेदनात रविकांत तुपकर यांनी नमुद केले आहे की, बुलडाणा जिल्हा हा कृषी बहुल जिल्हा आहे. जिल्ह्यात १ लाख ७० हजार कृषिपंप वीज ग्राहक शेतकरी आहेत. या  शेतकऱ्यांना जवळपास १७ हजार वितरण रोहित्रांवरून वीजपुरवठा केला जातो. जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र मुबलक आहे. त्यामुळे रब्बी हंगामात चांगले पीक येण्याची संधी असते मात्र महावितरणच्या नियोजनाभावी शेतकऱ्यांचे दरवर्षीच मोठे नुकसान होते. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीजेची आवश्यकता असते, मात्र ऐन याच हंगामात जिल्ह्यातील पाचशेहून अधिक रोहित्र  जळतात, हे जळालेले रोहित्र बदलून देण्यासाठी ऑईल उपलब्ध नसते. त्यामुळे रोहित्र बदलून मिळण्यासाठी शेतकऱ्यांना एक – एक महिना चकरा माराव्या लागतात.

या काळात सिंचनाअभावी शेतकऱ्यांची पिके सुकतात त्यामुळे उत्पादनात देखील घट येते. जिल्ह्यातील तिनही विभागात संपूर्ण रब्बी हंगामात जळालेली रोहित्रे दुरुस्त करून देण्यासाठी ६० हजार लिटर ऑईलची गरज आहे. सदर ऑईल टप्प्याटप्प्याने बुलडाणा जिल्ह्यात उपलब्ध करून द्यावे, जर ऑईल तातडीने उपलब्ध झाले नाही आणि ऑईल अभावी रोहित्र दुरुस्त करून मिळाल्यास विलंब झाल्यास महावितरणच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

खरीप हंगामात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उत्पादनांत मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामात उत्पन्नाची आशा आहे, अशा वेळी रोहित्रा अभावी शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज मिळाली नाही आणि त्यांचे नुकसान झाल्यास महावितरण महावितरणला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे, लागले असाही इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.