प्रतापराव जाधव बेईमान माणूस! मंत्रिपदाच्या लालसेने मातोश्रीसोबत बेईमानी केली! त्यांना आता कोणी राम - रामही घालत नाही! नरेंद्र खेडेकरांचा शेगावात हल्लाबोल

 
शेगाव(ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खासदार प्रतापराव जाधव बेईमान माणूस आहेत. मंत्रिपदाच्या लालसेपोटी त्यांनी मातोश्रीसोबत गद्दारी केली.ज्या शिवसेनेने तीनदा आमदार, तीनदा खासदार बनवले, मंत्री बनवले त्या शिवसेनेसोबत गद्दारी करतांना त्यांना लाज वाटली नाही असा हल्लाबोल ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकरांनी काल, शेगावात केला. शेगावातील बडा बालाजी मंदिरात काल,१९ सप्टेंबर रोजी ठाकरे गटाच्या शिवसेनेची बैठक पार पडली,या बैठकीत ते बोलत होते.

                                  जाहिरात

पुढे बोलतांना खेडेकर म्हणाले की, शिवसेनेसोबत जे ४० आमदार व १२ खासदार गद्दार झालेत, त्यापैकी काही ५० खोक्यांसाठी तर काही ईडीच्या धाकामुळे गेले. आपले खासदार प्रतापराव जाधव हे मंत्रिपदाच्या लालसेपोटी तर प्रताप सरनाईक ईडीचा ससेमिरा बंद व्हावा यासाठी मातोश्रीशी बेईमान झाले. ज्या बाळासाहेबांनी खा. जाधव यांना तीनवेळा आमदार केले. राज्यमंत्रीपद दिले, उध्दव ठाकरेंनी त्यांना दोनदा खासदारकी बहाल केली. तरीही अशा ठाकरे घराण्याशी त्यांनी गद्दारी केली आणि आता घाटबोरी येथे पार पडलेल्या शिंदे गटाच्या कार्यक्रमात ते उध्दव ठाकरेंना गद्दार म्हणत आहेत.

त्यांचे आता काही राहिले नाही, त्यांना कोणी राम-राम घालीत नाही. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे खेडेकर म्हणाले.  त्यामुळेच ज्यांनी घडविले त्यांच्याविषयी असे  विखारी फुत्कार ते सोडत आहेत. असा घणाघात खेडेकर यांनी केला. वेदांत फॉस्कॉन प्रोजेक्ट गुजरातला - पळविल्याबद्दल ते बोलतांना म्हणाले की, सर्व प्रोजेक्ट गुजरातलाच का पळविले जातात. विदर्भात शिवसेनेचे संजय नावाचे तीन आमदार होते, ते तिन्ही आमदार शिवसेनेची बेईमान झाल्याने विदर्भातील माता आता संजय नाव ठेवावे की, नाही असा विचार करीत असल्याची  बोचरी टिपणीही त्यांनी केली. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल असा आत्मविश्वास व्यक्त करून संघटन बळकटीसाठी शिवसैनिकांनी झपाटून कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, सहसंपर्कप्रमुख छगन मेहेत्रे, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, मा. तालुकाप्रमुख रमेश पाटील, ज्येष्ठ नेते भगवान मिरगे, उपजिल्हाप्रमुख राजपूत, खामगाव विधानसभा संघटक रवि महाले, नांदुरा तालुकाप्रमुख ईश्वर पांडव, मलकापूर तालुकाप्रमुख चांभारे, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख शैलजा ठाकरे यांची उपस्थिती होती. यावेळी छगन मेहेत्रे, दत्ता पाटील, वसंतराव भोजने, अविनाश दळवी यांचीही भाषणे झाली.