शहिद स्मारकातही शिरले राजकारण!  चार दिवसांत दोनदा झाले भूमिपूजन!! श्रेयवादाची लढाई रंगण्याची चिन्हे
 

 
चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  पुणे तिथे काय उणे असे पुण्याबाबत म्हटले जाते. पुण्याबाबत वैयक्तिक चर्चा व सोशल मीडियावर गाजणाऱ्या खमंग किस्यांवरून हे सिद्ध देखील होते.  अलीकडे  आटपाटनगरी चिखलीच्या बाबतीत देखील असेच म्हणावे लागतंय! इतर बाबी सोडा पण राजकारण बाबत चिखली कश्यातच उणे नाही किंव्हा उणेच आहे असे  चित्र आहे. याला रेणुकानगरीच्या शहीद जवान कैलास पवार यांचे नियोजित स्मारक देखील अपवाद नाहीये. या स्मारकाचे गत चार दिवसात दोनदा भूमिपूजन करण्यात आल्याने येथील राजकारणाने कोणता स्तर गाठला हे दिसून येते.

 

 १५ एप्रिलला  माजी आमदार राहूल बोंद्रे यांच्या हस्ते व नगरपालिकेच्या माजी अध्यक्षा प्रियाताई बोन्द्रे यांच्या  उपस्थितीत  विश्रामगृह समोरील नियोजित जागेत हा पहिला भूमिपूजन सोहळा पार पडला. या दोन्ही नेत्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला, पालकमंत्री यांचे साहाय्य घेतले आणि त्यामुळेच ११ लाख रुपयांचे बजेट असलेले हे स्मारक  मार्गी लागले असा दावा यावेळी करण्यात आला.

काही तांत्रिक कारणामुळे या समारंभाच्या बातम्या लागल्या नाही. मात्र आज , १९ एप्रिलला सकाळी चिखली नगरपरिषद  प्रशासनाच्या वतीने आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते भूमीपूजनाचे नियोजन असल्याची चर्चा कानावर आल्यावर मग माजी आमदार गटातर्फे आज प्रेस नोट काढण्यात आली. 

दरम्यान आज सकाळी श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते रीतसरपणे शासकीय भूमिपूजन सोहळा पार पडला. या स्मारकासाठी आमदार श्वेताताईनी मुख्याधिकाऱ्यांना जागा पाहणी व स्मारकासाठी पत्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले. स्मारक बांधकामासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना ताईंनी दिल्या होत्या. कार्यक्रमानंतर  नेहमीप्रमाणे प्रेस नोट वेगाने आजच्या आजच काढण्यात आली. चार दिवसांत दोनदा झालेल्या या भूमीपूजनाची खमंग चर्चा रंगणे स्वाभाविकच म्हणावे! त्याने चिखली तिथे काय उणे हे देखील सिद्ध झाले.
  
काय झाले होते त्यादिवशी..
 कारगीलच्या द्रास सेक्टर मध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्करातील चिखलीचे जवान कैलास पवार यांना सुटीवरून घरी परत असतांना ऑक्झिजन पातळी कमी झाल्याने १ ऑगस्ट रोजी वीरमरण आले होते. ४ ऑगस्ट रोजी चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात  शासकीय  इतमामात कैलास पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शहीद कैलास पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी लाखोंचा जनसागर त्यावेळी उसळला होता.